मुंबईतील एक किशोरवयीन विद्यार्थी आपल्या 'झूल' प्रकल्पाद्वारे जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांना प्रेरक उपक्रम राबवित आहे. हा एक हा विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयासंबंधीचा (स्टेम) उपक्रम आहे. त्याद्वारे 'रोबोटिक्स' आणि 'कोडिंग'बद्दलची आवड विद्यार्थ्यांमध्ये जागृत केली जाते.
मुंबईच्या 'धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल'मधील १७ वर्षीय आरव कौलने हा उपक्रम सुरू केला. त्याअंतर्गत नववी-दहावीतील विद्यार्थ्यांना 'मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंग'मध्ये प्रत्यक्ष कौशल्ये शिकविली जातात. जम्मू काश्मीरमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम आणि तांत्रिक विकासाला चालना देणे, तरुणांना व्यावहारिक ज्ञानाने सक्षम करणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आरवने सांगितले. 'स्टेम' हा या क्षेत्रातील शिक्षण, कौशल्ये आणि चांगल्या 'करिअर'ला प्रोत्साहन देण्यासाठीचा कार्यक्रम आहे. आरव यांनी येथे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली असता सिन्हा यांनी या उपक्रमाची प्रशंसा करून जम्मू-काश्मीरमधील तंत्रज्ञान परिवर्तन आणि युवा सक्षमीकरणाच्या उद्देशाला हा उपक्रम पूरक असल्याचे गौरवोद्वार काढले.
आरवने सांगितले, की 'रोबोटिक्स' हे फक्त तंत्रज्ञान नसून, त्याद्वारे समस्यांची सोडवणूक आणि सर्जनशील विचारसरणीला चालना मिळते. शिक्षण सुलभ आणि आनंददायी बनवण्याचे 'स्टेम'चे ध्येय आहे. या उपक्रमांतर्गत असलेले प्रशिक्षण येथील शिक्षक आनंदाने घेत आहे. हे शिक्षण आकर्षक अन् व्यावहारिक आहे, शिक्षक ही कौशल्ये आपल्या वर्गातील मुलांना देण्यासाठी वापरत आहेत. 'फर्स्ट, 'रोबोटेक्स', 'मेक एस्क' सारख्या जागतिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा आरव एक कुशल आंतरराष्ट्रीय 'रोबोटिक्स चॅम्पियन' आहे. आरवने जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांना आपले ज्ञान-कौशल्य प्रदान करण्यासाठी हा 'झूल' प्रकल्प सुरू केला.
शिकण्यासाठी अनोखा दृष्टिकोन
'जम्मू संस्कृती स्कूल'मधील अनुपमा शर्मा यांनी सांगितले, की आमच्या तांत्रिक आणि व्यावहारिक क्षमताविकासासाठी आमच्या विद्यार्थ्यांना अशा आणखी उपक्रमांची आवश्यकता आहे. मीनाक्षी गुप्ता म्हणाल्या, की हा प्रकल्प विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक अनोखा दृष्टिकोन प्रदान करतो. ही फक्त सुरुवात असल्याचे आरव सांगतो. या उपक्रमाच्या विस्तारासाठी शाळा, तंत्रज्ञानप्रेमी शिक्षक आणि सामाजिक नेत्यांना अतिरिक्त सहभाग-योगदानाचे आवाहन आरवने केले. 'लॅपटॉप', आवश्यक जागा आणि प्रदर्शनाच्या प्रचारात मदतीचे आवाहन त्याने संबंधितांना केले.