जून २०२४ची UGC - NET परीक्षा रद्द - शिक्षण मंत्रालय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 2 Months ago
 UGC - NET
UGC - NET

 

राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) घेतलेल्या यूजीसी-नेट परीक्षेच्या विश्‍वासार्हतेबाबत तडजोड झाल्याची माहिती मिळाल्याने शिक्षण मंत्रालयाने ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप ताजा असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. संभाव्य गैरप्रकाराची तपासणी करण्यासाठी हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘नीट’च्या परीक्षेतील गोंधळावरून देशभर विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून विरोधकही सरकारवर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर, कालच (ता. १८) देशातील विविध केंद्रांवर ‘राष्ट्रीय पात्रता परीक्षा’ आयोजित करण्यात आली होती. आधीची पद्धत मोडून यंदा कागद आणि पेनच्या साह्याने परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला विक्रमी ११ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता.

मात्र, परीक्षा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे आज शिक्षण मंत्रालयाने ही परीक्षा रद्द करत असल्याचे जाहीर केले. ‘विद्यापीठ अनुदान आयोगाला राष्ट्रीय सायबर गुन्हे विश्र्लेषण पथकाकडून परीक्षेबाबत काही माहिती समजली. या परीक्षेच्या विश्‍वासार्हतेला तडा गेल्याचे या माहितीवरून प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता कायम राखण्यासाठी नुकतीच आयोजित केलेली ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. ही परीक्षा नव्याने घेतली जाणार असून त्याबाबत नंतर माहिती जाहीर केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

सहायक प्राध्यापक म्हणून निवड होण्यासाठी आणि विद्यापीठांमध्ये पीएचडीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी यूजीसी-नेट ही परीक्षा घेतली जाते.

‘नीट’बाबत अहवाल मागविला
पाटण्यात आयोजित केलेल्या ‘नीट’ परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या आरोपानंतर या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाला दिले आहेत. बिहार आणि इतर काही राज्यांमध्ये या परीक्षेची प्रश्‍नपत्रिका फुटल्याचा आणि इतर गैरप्रकार झाल्याचा आरोप झाला आहे. यापैकी पाटण्यात झालेल्या गैरप्रकारांबाबतचा अहवाल मंत्रालयाने मागविला आहे.