भारतीय सैनिक आणि सामान्य काश्मिरी जनता यांच्यात सुसंवाद स्थापन व्हावा, त्यांच्यामध्ये विश्वासाचे नाते तयार व्हावे यासाठी भारतीय सेना वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. काश्मीरमधील लष्करी कारवायांची जबाबदारी असलेल्या '15 कॉर्प्स' अर्थात 'चिनार कॉर्प्स' या भारतीय लष्कराच्या एका तुकडीनेही अशाच एका स्तुत्य उपक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते. त्यांनी दक्षिण काश्मीर खोऱ्यातील शोपियान जिल्ह्यात मुलींसाठी काश्मीरचे पारंपारिक मार्शल आर्ट्स स्क़ाय (SQAY) चे सत्र आयोजित केले होते. शोपियान हा प्रदेश जरी जंगल, पर्वत आणि सफरचंद यांसाठी ओळखला जात असला तरी मार्शल आर्टला भारतासह जगभरात लोकप्रियता मिळून देण्याचे श्रेयही या भागाला जाते.
“सक्षमीकरणाची सुरुवात स्वसंरक्षणाने होते”, हे वाक्य डोळ्यासमोर ठेऊन या प्रदेशातील तरुणींना सक्षम आणि सशक्त बनवण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्याने एक नवीन उपक्रम सुरु केला. याद्वारे मुलींना नि:शस्त्र लढाईचे प्रशिक्षण दिले जाते. सामाजिक बंधने झुगारून, स्वावलंबनाचे धडे देणे आणि सुरक्षित भविष्याच्या दृष्टीने त्या मुलींना सक्षम करणे हा त्यामागील उद्देश आहे.
Empowerment begins with self-defense! #ChinarWarriors organised a Martial Art (SQAY) session for girls at #Shopian. The session trained girls on Un-Armed Combat techniques & empowered them to break barriers, embrace strength & pave the way for a safer tomorrow.#G20@adgpi pic.twitter.com/vx1ID8MMHV
— Chinar Corps🍁 - Indian Army (@ChinarcorpsIA) May 19, 2023
SQAY ही काश्मीरमधील प्राचीन पारंपारिक युद्ध कला आहे. वन्य प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काश्मिरी या स्वदेशी लढाऊ कौशल्याचा वापरत असत. SQAY हा एक पर्शियन शब्द आहे ज्याचा अर्थच युद्धाचे तंत्र/ कसब (Knowledge of war) असा होतो.
काश्मिरी तरुणाईत या मार्शल आर्ट्सची प्रचंड क्रेझ आहे. या खेळाच्या माध्यमातून खोऱ्यातील तरुणाई आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा लौकिक वाढवत आहे. मग ती यावर्षी नेपाळमध्ये झालेल्या दक्षिण आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी 14 वर्षीय तेहनीत मुश्ताक असो की दुरदाना युसुफ असो. परिसरातील तरुणांचे हे गुण हेरून चिनार कॉर्प्सने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
यासोबतच चिनार कॉर्प्सकडून वेळोवेळीइतरही उपक्रम हाती घेण्यात येतात. दक्षिण काश्मीरमधील तरुणांना राष्ट्र उभारणीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न या तुकडीकडून करण्यात येतोय. तरुणांना देशाच्या समृद्ध सामाजिक आणि धार्मिक संस्कृतीची माहिती व्हावी यासाठीही नवीन उपक्रमही त्यांच्याकडून हाती घेण्यात आले आहेत. शिवाय या तरुणांमध्ये खिलाडूवृत्ती आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढावी यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
महिला सशक्तीकरणाला चालना देणारे उपक्रमही चिनार कॉर्प्सकडून राबवण्यात येतात. मे महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मदतीने त्यांनी ‘कुपवाडा महिला T-10 क्रिकेट चॅम्पियनशिप 2023’ च्या सामन्यांचे आयोजन केले होते. त्यात परिसरातील नवोदित महिला क्रिकेटपटू खूप उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. इतकेच नव्हे तर चिनार वॉरियर्सतर्फे डांगीथल, बांदीपोरा येथील नागरिकांसाठी मैत्रीपूर्ण व्हॉलीबॉल स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.