विविध वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय पात्रता कम प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहाराचे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तीव्र पडसाद उमटले. लोकसभेचे कामकाज याच मुद्यावरून अनेकदा ठप्प झाले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘नीट’चा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.
मात्र लोकसभाध्यक्षांनी त्यांना परवानगी नाकारली. यामुळे संतप्त विरोधकांनी गोंधळ घातल्याने लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत (१ जुलै) तहकूब करण्यात आले.
या गोंधळातच राहुल गांधींचा ध्वनिक्षेपक बंद करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला. दरम्यान, या प्रकारामुळे लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाची चर्चा आज सुरू होऊ शकली नाही. राज्यसभा आणि लोकसभेमधील विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या गट नेत्यांची बैठक काल (ता. २७) दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पार पडली.
त्याच बैठकीमध्ये संसदेत ‘नीट’ परीक्षेचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्याचे ठरले होते. त्यानुसार संसदेत सर्व कामकाज बाजूला ठेवून सर्वप्रथम या मुद्द्यावर चर्चा व्हावी या मागणीसाठी राज्यसभेत काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील व अन्य जणांनी तर लोकसभेत काँग्रेसच्या मणिकम टागोर, गौरव गोगोई यांच्यासह अन्य खासदारांनी कार्यस्थगन प्रस्तावाच्या नोटिसा दिल्या होत्या. राहुल गांधी यांनीही सकाळी संसद भवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना ‘नीट’ तसेच पेपरफुटीच्या मुद्द्यावर सरकारला जाब विचारणार असल्याचे स्पष्ट केले होते.
बिर्लांनी दिला दाखला
लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी उभे राहून हा विषय उपस्थित केला. मात्र या अधिवेशनात राष्ट्रपती अभिभाषण असल्याने कार्यस्थगन प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही आणि तसेच शून्यकाळ नसेल असे आधीच सर्व खासदारांना कळविण्यात आल्याचा दाखला लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला.
यादरम्यान राहुल गांधींचा ध्वनिक्षेपक बंद असल्याचा आरोप करण्यात आला. विरोधी बाकांवरून आक्षेप घेण्यात आल्यानंतर लोकसभाध्यक्षांनी आपण कोणाचाही ध्वनिक्षेपक बंद करत नाही असे स्पष्ट केले. विरोधी पक्षनेता या नात्याने संसदीय मर्यादांचे पालन कराल अशी अपेक्षा असल्याची टिपणी त्यांनी राहुल गांधींना उद्देशून केली.
आता तो मुद्दा मांडू नका
राहुल गांधींनी ‘नीट’च्या मुद्द्यावर संसदेतून देशातील तरुणांना सरकार आणि विरोधी पक्षांतर्फे संदेश जाणे आवश्यक असल्याने त्यासाठी कार्यस्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्याकडे अध्यक्षांचे लक्ष वेधले. यावर, अभिभाषणावरील चर्चेत हवे तेवढे बोला पण आता हा मुद्दा मांडता येणार नाही असा पवित्रा बिर्ला यांनी घेतला आणि कार्यक्रम पत्रिकेवरील पुढील विषय पुकारला.
यामध्ये राहुल गांधींचा आवाज येणे बंद झाल्याने चवताळलेल्या काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी राहुल गांधींचा ध्वनिक्षेपक बंद झाल्याचा आरोप करत अध्यक्षांपुढील मोकळ्या जागेत धाव घेतल्याने गोंधळ वाढला. यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज दुपारी बारापर्यंत तहकूब केले.
...अन् बिर्लांनी सुनावले
सभागृहाचे कामकाज दुपारी बाराला सुरू झाल्यानंतरही याच गोंधळाची पुनरावृत्ती झाली. राहुल गांधींना बोलू न दिल्याचे कारण देत विरोधी पक्षांच्या खासदारांनी हौद्यात उतरून जोरदार घोषणाबाजी केली. नाराज झालेल्या लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना फटकारले तर संसदेच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारी विरोधकांची ही कृती निषेधार्ह असल्याची टिपणी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केली.
सरकार सर्व विषयांवर उत्तर द्यायला तयार असल्याचे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने लोकसभाध्यक्षांनी ‘संसदेतील विरोध आणि सडकेवरील विरोध यात फरक आहे’ अशा कानपिचक्या विरोधकांना दिल्या आणि सोमवारपर्यंत कामकाज तहकूब केले.
सरकारला सकारात्मक चर्चा नको - राहुल
संसदेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्हिडिओ संदेश जारी करून सरकारला संसदेमध्ये सकारात्मक चर्चा नको असल्याचा आरोप केला. राहुल गांधींनी यात म्हटले आहे की ‘‘ विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला नीट परीक्षा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर सरकारसोबत रचनात्मक चर्चा करायची आहे. परंतु आज संसदेत त्यासाठी परवानगी मिळाली नाही ही दुर्दैवाची बाब आहे. देशभरातील लाखो कुटुंबीयांमध्ये यावरून असलेली चिंता हा अतिशय गंभीर विषय आहे. आम्ही पंतप्रधानांना विनंती करतो की त्यांनी या मुद्द्यावर चर्चा करावी आणि विद्यार्थ्यांना योग्य तो सन्मान द्यावा.’’
लातूरमधील तपास ‘सीबीआय’कडे
लातूर - राज्यात गेले काही दिवस गाजत असलेले येथील ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीप्रकरण आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचे दिल्लीतील पथक शनिवारी (ता. २९) येथे दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
हे प्रकरण सीबीआयकडे गेल्याने स्थानिक पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची व्याप्ती इतर राज्यांतही समोर येत आहे. हे प्रकरण ‘सीबीआय’कडे द्यावे असा प्रस्ताव लातूर पोलिसांनी शासनास पाठवला होता. त्यानुसार निर्णय झाला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत आले होते.
या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नंतर याचा तपास स्थानिक पोलिसांकडे देण्यात आला होता. यात पोलिसांनी संजय जाधव व जलिल पठाण या शिक्षकांना अटक केली होती. ‘एटीएस’ने सुरवातीला ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलेला इराण्णा कोनगलवार याचा तसेच येथील संशयितांचा फरार म्होरक्या गंगाधर गुंडे यांचा शोध पोलिस घेत होते.