‘आयआयटी मद्रास’चा पहिला शैक्षणिक कॅम्पस टांझानियात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

नवी दिल्ली - प्रथितयश शैक्षणिक संस्था असलेल्या आयआयटीचा पहिला शैक्षणिक कॅम्पस आफ्रिकेमधील टांझानिया या देशात सुरू होणार आहे. यासंदर्भात भारत आणि टांझानिया दरम्यान झालेल्या करारानुसार आयआयटी मद्रासचा कॅम्पस झांजिबार (टांझानिया) मध्ये सुरू करण्यात येईल.

 

यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, झांजिबारचे अध्यक्ष डॉ. हुसेन अली मविनयी, भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर उपस्थितीत काल भारतीय शिक्षण मंत्रालय, आयआयटी मद्रास आणि टांझानियाचे शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण मंत्रालय यांच्यात करार झाला. टांझानियातील भारतीय उच्चायुक्त विनय श्रीकांत प्रधान, आयआयटी मद्रासचे डीन (वैश्विक सहयोग) प्रा. रघुनाथन रंगास्वामी, टांझानिया सरकारचे कार्यवाहक प्रधान सचिव खालिद मसूद वजीर यांनी करारावर सह्या केल्या.

 

 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आंतरराष्ट्रीयकरणावर भर असून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय विद्यापीठांना परदेशांमध्ये कॅम्पस सुरू करण्यास प्रोत्साहन देण्याच्या योजनेचा भाग म्हणून या कराराकडे पाहिले जात आहे. या कॅम्पसमधील शैक्षणिक अभ्यासक्रम, विद्यार्थी निवडीचे निकष आणि शैक्षणिक तपशील आयआयटी मद्रासतर्फे ठरविले जातील.

 

तर संचालन आणि अन्य खर्च झांझिबार-टांझानिया सरकारतर्फे केला जाईल. या कॅम्पसमध्ये नोंदणी करणाऱ्या विद्यार्थांना आयआयटी मद्रासची पदवी दिली जाईल. दरम्यान, हा निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आयआयटी मद्रासच्या विस्तारासाठी उपयुक्त ठरेल, असेही सरकारचे म्हणणे आहे.

 

भारतीय विद्यार्थी देखील शिकणार

टांझानियांतील कॅम्पसमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम, शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची निवड याची निश्‍चिती आयआयटी मद्रासकडून केली जाणार आहे. त्यासाठी लागणारे भांडवल आणि संस्था चालविण्याचा खर्च टांझानिया सरकारकडून केला जाणार आहे. या कॅम्पसमध्ये नामांकित विद्यार्थ्यांना आयआयटी मद्रासची पदवी दिली जाणार आहे.

 

या कॅम्पसमध्ये आफ्रिका आणि अन्य देशांतील विद्यार्थी देखील अध्यापन करू शकतील. भारतीय विद्यार्थ्यांना देखील या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. आयआयटी मद्रासचा विस्तार झाल्याने शैक्षणिक प्रतिष्ठा आणि राजनैतिक संबंधात वाढ होणार असून परदेशात आयआयटी मद्रासचे शिक्षण आणि संशोधनाच्या गुणवत्तेत वाढ होईल.

 

‘आयआयटी मद्रास’चा विस्तार

  • २०२० मध्ये परदेशात शिक्षण संस्था
  • स्थापन करण्याची १६ सदस्यीय समिती
  • परदेशात आयआयटी संस्था सुरू करण्याच्या दिशेने काम करण्याची शिफारस
  • टांझानियाच्या झांजिबार येथे आयआयटी मद्रासचे कॅम्पस
  • झांजिबार हे पूर्व आफ्रिकेतील एक द्विपसमूह असून तो १९६४ मध्ये विलीन
  • येत्या ऑक्टोबरपासून अभ्यासक्रमास सुरुवात