अखेर 'UPPSC'ने परीक्षांवर मारली फुली

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
उत्तर प्रदेशात यूपीपीएससी विरोधात आंदोलन करताना विद्यार्थी
उत्तर प्रदेशात यूपीपीएससी विरोधात आंदोलन करताना विद्यार्थी

 

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग (यूपीपीएससी) झुकला असून विद्यार्थ्यांचा 'वन डे, वन शिफ्ट'चा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.

पडताळणी अधिकारी (आरओ) आणि साहाय्यक पडताळणी अधिकारी (एआरओ) या पदांसाठीची पूर्वपरीक्षा रद्द करण्यात आली असून प्रांतीय सनदी सेवेची परीक्षा जुन्या पॅटर्ननुसारच होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतली जावी म्हणून शेकडो विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत होते. आता ही परीक्षा एकाच दिवशी होईल असे जाहीर करण्यात आले आहे. 

गेल्या चार दिवसांपासून शेकडो विद्यार्थी या मागणीसाठी आयोगाच्या मुख्यालयासमोर आंदोलन करत होते. आज विद्यार्थ्यांनी पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स तोडून टाकत आयोगाच्या मुख्यालयाच्या दिशेने धाव घेतली होती. पोलिस उपायुक्त अभिषेक भारती माध्यमांशी बोलताना म्हणाले की आयोगाच्या मुख्यालयासमोर काही विद्यार्थी हे शांततेत आंदोलन करत होते पण याचवेळी काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी घुसखोरी करत त्यांना प्रशासनासोबत चर्चा करण्यापासून रोखले. हेच घुसखोर विद्यार्थ्यांना चिथावणी देण्याचे काम करत होते.

परीक्षेची तयारी करणाऱ्या एकाही विद्यार्थ्याला आम्ही ताब्यात घेतलेले नाही. 'यूपीपीएससी'चे सचिव अशोक कुमार म्हणाले की सरकारी आदेशानुसार केवळ शैक्षणिक संस्थांनाच परीक्षा केंद्रे बनविण्यास सांगण्यात आले होते.

परीक्षांची व्याप्ती
आरओ आणि एआरओ या दोन्ही परीक्षांना मिळून उत्तर प्रदेशातील ७५ जिल्ह्यांतील पाच लाख ७६ हजार विद्यार्थी बसले असून, परीक्षा केंद्रांची संख्या मात्र केवळ चार लाख ३५ हजार एवढी आहे. या परीक्षार्थीची संख्या लक्षात घेता. दोन दिवसांमध्ये ही परीक्षा घेणे अपरिहार्य होते. याआधी आयोगाकडूनच प्रांतीय नागरी सेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी ७ आणि ८ डिसेंबर आणि आरओ तसे एआरओ परीक्षेसाठी अनुक्रमे २२ आणि २३ डिसेंबर अशा तारखांची घोषणा करण्यात आली होती.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter