शाळा आणि अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये मुलांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी शालेय सुरक्षा आणि संरक्षणासंबंधी ‘पॉक्सो’नुरुप विकसित केलेल्या २०२१ च्या मार्गदर्शक तत्त्वांची सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या शाळांमध्ये अमलात आणावे, असे निर्देश आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिले.
सरकारी, खासगी अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांची सुरक्षा आणि संरक्षणाच्या बाबतीत शाळांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करण्याची तरतूद या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन केंद्राच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने २०२१ साली ही मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली होती.
शाळांमध्ये जाण्या-येण्यापासून सुरक्षा आणि संरक्षणाची खासगी शाळांमध्ये शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि शिक्षक तसेच सरकारी शाळांमध्ये शाळांचे प्रमुख, प्रभारी प्रमुख, शिक्षण आणि प्रशासनाची जबाबदारी निश्चित करणे आणि मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत व्यवस्थापन वा कोणत्याही व्यक्तीने दाखवलेल्या निष्काळजीपणा सहन न करणे या धोरणांवर भर देणे अशा उद्देशांचा या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समावेश आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधिसूचनेच्या स्थितीविषयी माहिती द्यावी, असेही निर्देश दिले आहेत.