WPL : धारावीच्या सिमरन शेखला विक्रमी किंमत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 19 d ago
सिमरन शेख
सिमरन शेख

 

जयेंद्र लोंढे
 
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये जगातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणजे 'धारावी'. ५५०  एकरांवर पसरलेल्या या वस्तीमध्ये अंदाजे १०  लाख नागरिक राहतात. १००  फुटांच्या झोपडीमध्ये आठ ते दहा लोक दाटीवाटीने राहतात. इथे पायाभूत सुविधांचा वानवा आहे. स्वछता आणि आरोग्य यांची स्थितीही अतिशय हालाकीची आहे. अशा परिस्थितीत धारावीतील एक मुस्लिम मुलगी क्रिकेट खेळू लागते आणि थेट महिला आयपीएलमध्ये निवडली जाते... हा अविश्वसनीय आणि प्रेरणादायी प्रवास आहे सिमरन शेख हिचा!

भारतात होणार असलेल्या महिला प्रीमियर लीगसाठी लिलाव प्रक्रिया रविवारी पार पडली. यामध्ये मुंबईची अष्टपैलू खेळाडू सिमरन शेख हिच्यावर सर्वाधिक रकमेची बोली लावण्यात आली. गुजरात जायंट्स संघाने तिला १.९० कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले. 

गतवर्षी सिमरनची महिला प्रीमियर लीगसाठी निवड झाली होती. त्यावेळी तिला युपी वॉरियर्सने १० लाखांच्या मूळ किंमतीवर आपल्या संघात समाविष्ट केले होते. महिला प्रीमियर लीगमध्ये सिमरनची निवड झाल्यानंतर आवाज मराठीने तिच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी ती म्हणते,“धारावीच्या गल्ली क्रिकेटपासून माझ्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात झाली. मी  मुलींसोबत नाही तर मुलांसोबत क्रिकेट खेळायचे. वयाच्या १५ वर्षांपासून मला क्रिकेटचे वेड लागले. महिला क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळले जाते हे मात्र मला माहीत नव्हते.” 

पुढे ती म्हणते, “गल्ली क्रिकेट खेळता खेळता मी क्रॉस मैदान येथील युनायटेड क्लबशी जोडली गेली. रोमडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी क्रिकेटमधील बारकाव्यांचा अभ्यास केला. संजय साटम सर यांच्याकडून मला क्रिकेट किटची मोलाची मदत झाली. क्रिकेटसाठी लागणारे साहित्य त्यांच्याकडून मला मिळाले. संजय साटम सर यांना मी कधीही विसरु शकणार नाही.” 

गल्ली क्रिकेट आणि लेदर चेंडूने खेळले जाणारे मुख्य क्रिकेट यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. याबाबत तिला विचारले असता ती म्हणते, “गल्ली क्रिकेट व मुख्य क्रिकेट यामध्ये खूप फरक आहे, हे मलाही मान्य आहे. पण मला क्रिकेटची आवड होती. त्यामुळे सर्वस्व पणाला लावले. टेनिस चेंडूने खेळल्या जाणार्‍या क्रिकेटपेक्षा मुख्य क्रिकेट सोपे वाटले. म्हणून समरस होऊन पुढे गेले.”  

सिमरनचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला. क्रिकेट खेळण्याविषयी कुटुंबीयांची भूमिका काय होती असा प्रश्न विचारला असता ती म्हणते, “आम्ही चार बहीणी व तीन भाऊ. आई घर सांभाळायची तर वडील वायरिंगचे काम करायचे. माझ्यापेक्षा दोन बहीणी मोठ्या आहेत. बाकी सर्व माझ्यापेक्षा लहान आहेत. आई-वडीलांनी मला क्रिकेट खेळायला केव्हाही रोखले नाही. मला कुठलीही विरोध केला नाही. आई-वडीलच नव्हे तर काका,आत्या अशा नातेवाईकांकडूनही मला विरोध झाला नाही. माझ्या परीसरातूनही मला मोलाचे सहकार्य मिळाले. त्यामुळे इथपर्यंतचा प्रवास चांगला झाला आहे.” 

सिमरन तिच्या शिक्षणाविषयी बोलताना म्हणते, “माझे शिक्षणात मन लागत नव्हते. अभ्यास न केल्यामुळे दहावीच्या परीक्षेत मी नापास झाले. त्यानंतर मी शिक्षणात पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाही आणि क्रिकेटमध्येच करिअर करण्याचे ठरवले. मुंबईच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धा खेळण्याचा अनुभव मिळवला. १९ वर्षांखालील क्रिकेटही खेळले. मुंबईच्या वरिष्ठ संघातूनही खेळण्याची संधी मिळाली. मी फलंदाज आहे. मधल्या फळीत फलंदाजी करायला मला आवडते. पण टी-२० क्रिकेटमध्ये सलामीला पाठवण्यात आल्यानंतरही मी उत्तम खेळ करू शकते.” 

ती पुढे म्हणते, ”आतापर्यंत मी स्वतःच्या इच्छाशक्तीवर पुढे आले. यापुढेही मी प्रयत्नांची शिकस्त करणार आहे. विराट कोहलीची फलंदाजी मला आवडते. तर महिलांच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एलिसा पेरीचा खेळ मला भावतो. भारतीय महिला संघातील खेळाडूचे नाव घ्यायचे झाल्यास जेमिमा रॉड्रिग्ज हिचा खेळ छान वाटतो.” 

मिताली राज, झुलन गोस्वामी, हरमनप्रीत सिंग, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज यांसारख्या वरिष्ठ संघातील महिला खेळाडूंसोबत एका स्पर्धेनिमित्त संवाद साधण्याची संधी मिळाल्याचे सिमरन सांगते. जेमिमासोबत तर ती मुंबईसाठी एकत्रित खेळली आहे. त्यांचा अनुभव आमच्यासारख्या युवा खेळाडूंसाठी मोलाचा ठरू शकतो.

महिला क्रिकेटबाबत विचारले असता ती म्हणाली, “गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक स्तरावर महिला क्रिकेटचा विकास झाला आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलियानंतर आता भारतातही टी-२० लीगला सुरुवात होत आहे. महिला खेळाडूंवर लाखांची, कोटींची बोली लावण्यात आली आहे. यामुळे महिला खेळाडूंचा आर्थिक प्रश्नही मिटला जाणार आहे. भविष्यात या स्पर्धांमुळे महिला क्रिकेटला प्रचंड फायदा होणार आहे.” 

भारतीय महिला संघात खेळण्याचे स्वप्न सिमरनने बघितले आहे. तिला भारतीय महिला संघाचे प्रतिनिधीत्वही करायचे आहे. एवढेच नव्हे तर देशाला विश्वकरंडक जिंकून देण्याचे ध्येयही सिमरनने डोळ्यांसमोर ठेवले आहे. प्रयत्नांच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिखर गाठता येते हे सिमरन शेखने दाखवून दिले आहे. तिचे यश इतर तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे. धारावीची सिमरन काही वर्षांत भारतीय संघाचे नेतृत्व करेल, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

- जयेंद्र लोंढे


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter