श्रीगणेश इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांच्या समवेत साद शेख
आयुष्याच्या महत्वाच्या वळणावर त्याला बिकट आव्हानाला सामोरे जावे लागले. तो हातांच्या बोटांशिवायच जन्माला आलाय. एका अंगठ्याचा जोरावर तो आता दहावीची परीक्षाही देतोय. ही कथा आहे मानसिक परिपक्वतेद्वारे शारीरिक अपंगत्वावर कणखरपणे मात करणाऱ्या साद शेख याची.
राहाता तालुक्यातील वाळकी येथे राहणारा १५ वर्षांचा साद सध्या दहावीची परीक्षा देतोय. कोऱ्हाळे येथील श्रीगणेश इंटरनॅशनल स्कूलचा तो विद्यार्थी. सादला जन्मापासून दोन्ही हातांना बोटे नाहीत, केवळ एक अंगठा आहे. तरीही इतर विद्यार्थ्यांप्रमाणे त्याने मराठीचा पहिला पेपर सहजतेने दिला. एक तासापेक्षा अधिक कालावधी दिलेला असतानाही त्याने तो पेपर अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत केवळ पंधरा मिनिटे उशिराने दिला.
बोर्डाच्या पहिल्या पेपरनंतर त्याचा अनुभव सांगताना साद म्हणतो की, “पेपर लिहिताना रेषा आखणे आणि घड्या जुळविणे यात मजा थोडा वेळ गेला. त्यामुळे मला पंधरा मिनिटांचा वेळ अधिक लागला. मी आत्मविश्वासाने दहावीची परीक्षा देत आहे. दोन्ही हातांना बोटे नाहीत म्हणून माझे काही अडत नाही आणि अडणार देखील नाही.”
सादचा हाच आत्मविश्वास त्याला यशाचे शिखर गाठण्यास मदत करणार आहे. दोन्ही हातांना बोटे नसताना देखील वेगाने लेखन करण्याचे आणि पायाची मदत घेऊन आकृत्या काढण्याचे कौशल्य त्याने आत्मसात केले. त्याचे लेखन कौशल्य पाहून पर्यवेक्षक देखील चकीत झाले. सादला घडवण्यात त्याच्या कुटुंबीयांबरोबरच तो ज्याठिकाणी शिकतो त्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांचाही मोलाचा वाटा आहे.
दोन्ही हाताला बोटे नसताना देखील सादने आत्मसात केलेल्या कौशल्याविषयी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विजय शेटे म्हणतात, “दोन्ही हातांना एकही बोट नसताना ज्या जिद्दीने सादने आपली शैक्षणिक प्रगती केली ती खरोखरीच वाखाणण्याजोगी आहे. श्रीगणेश शैक्षणिक संकुलातील स्कॉलर विद्यार्थी म्हणून सादने आपली ओळख निर्माण केली आहे. त्याचे मनोबल अतिशय उच्च दर्जाचे आहे. त्याला घडवताना आमच्या सर्व शिक्षकांना देखील आनंद वाटतो आणि समाधान देखील मिळते.”
साद शाळेत दाखल झाल्यावर प्रा. शेटे यांनी त्याच्यावर खास लक्ष केंद्रित केले. त्याच्या लेखनाला वेग कसा येईल यासाठी मार्गदर्शन केले. सादने वेगाने लेखन करण्याचे कौशल्य आत्मसात केले. तो शाळेतील एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. नववीच्या परीक्षेत त्याला ८५ टक्के गुण मिळाले. दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळवायचे त्याचे स्वप्न आहे.
साद हा अतिशय जिद्दी मुलगा आहे. त्याची हीच चिकाटी आणि जिद्दी स्वभावामुळे आज त्याचे बोटांवाचून फारसे काही आडत नाही. परंतु हाताला एकच अंगठा असल्यामुळे त्याच्या हालचाली मर्यादितच आहेत. अंगठ्याची व्यवस्थित हालचाल व्हावी यासाठी त्याचे आजोबा चांद टेलर यांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. परंतु त्यालाही म्हणावे असे यश आले नाही. मात्र, तरीही साद जीवनाची लढाई हरला नाही.
लहानपणापासूनच बोटाशिवाय दोन्ही हात एकत्र करून सादने प्रत्येक गोष्ट करण्याचे कौशल्य आत्मसात करायला सुरुवात केली. बोटे नसलेले दोन्ही हात एकत्र करून तो पेन धरतो आणि वेगाने लेखन करतो. आकृत्या रेखाटण्यासाठी जमिनीवर बसून पायाच्या मदतीने दोन्ही हातांनी धरलेल्या पेन्सिलच्या सहाय्याने भराभर आकृत्या रेखाटतो.
फक्त अभ्यासाच नाही तर साद मैदानी खेळांमध्ये देखील पारंगत आहे. तो सायकलही चालवतो. मात्र त्याला शाळेचा डबा देताना पोळी किंवा भाकरीचे प्रत्येक घासाचे तुकडे करून द्यावे लागतात. मित्रांचे थोडे सहकार्य घेऊन तो शाळेत आरामात दुपारचे भोजन करतो. अशा पद्धतीने रोजच्या जीवनातील आव्हानांना सामोरे जात साद यशाचे शिखर गाठत आहे.
जिद्द, मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यशाचा मार्ग सूकर होतो, असे म्हणतात. १५ वर्षांचा साद शेख याच मार्गावर चालत आहे. त्याचे पुढील स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्याला बळ मिळो याच सदिच्छा.