प्रज्ञा शिंदे
सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून, आज लाखो तरुण- तरुणी वर्षानुवर्षे मेहनत करत आहेत. एकवेळचं जेवण चुकलं तरी चालेल; पण अभ्यासिकेला जाण्याची वेळ चुकायला नको, असा त्यांचा दिनक्रम चालू असतो. ताणतणाव, रात्ररात्र जागणं, झोप येऊ नये म्हणून कमी जेवणं, समाजाचे टोमणे ऐकत राहणं या गोष्टी तर जणू त्यांच्या पाचवीला पुजलेल्या असतात. या सगळ्यातून काहीजण मोठ्या जिद्दीनं स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होतात. मग तासनतास जागरण करत अभ्यास करून डोळ्यांभोवती झालेली काळी वर्तुळं, यशस्वी झाल्याचा निकाल पाहून आनंदाश्रूंनी ओलसर होतात. तेव्हा मग या साऱ्या कष्टाचं चीज होतं. त्यांनतर होणारा हा आनंद शब्दात व्यक्त होऊ न शकणाराच असतो.
असाच आनंद, सुख आणि समाधान तबस्सुम मुल्लाने आपल्या पदरी खेचून आणलंय. हा संघर्ष होता ७ वर्षांचा. लढा होता आर्थिक संकटं, गरिबी, समाजाचे टोमणे, अनेक प्रथा यांच्या विरोधात आणि परीक्षा होती बापाने टाकलेल्या विश्वासाची, स्वतःच्या स्वप्नाची आणि इच्छाशक्तीची. अनेकांनी साथ सोडली तर अनेकांनी प्रोत्साहीतही केलं.
‘घर गहाण टाकील पण पोरीला अधिकारीच करील’, असं म्हणणाऱ्या बापाचा पाठींबा आणि हिम्मतीमुळे तबस्सुम आज ग्रामविकास अधिकारी बनली आहे.
सांगली येथील वाळवा तालुक्यातील बोरगावच्या गरीब कुटुंबातील ही मुलगी. तिचे वडील गावात शिवणकाम करतात. आईही महिलांचे कपडे शिवते. अशा परिस्थितीत जन्मलेल्या तबस्सुमने बालपणापासून जगण्याचा संघर्ष केला आहे. तिच्या कुटुंबाला सहकारी संस्थांचे शैक्षणिक कर्ज घ्यावे लागले. यामध्ये कुटुंब कर्जबाजारी झाले. वडिलांना तुटपुंजी असणारी शेतीही विकावी लागली. पण तरीही त्यांनी तिच्या भावाला आणि तबस्सुमलाही इंजिनिअर केलं.
मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी तिने प्राप्त केली. पुढे तिला एम. टेक करायचं होतं,पण त्यात वडिलांचा अपघात झाला. त्यांना काम करणं अवघड झालं, म्हणून तिच्या भावाला आणि तिलाही गावी यावं लागलं. त्यात कोरोनाची भर पडली आणि सगळ आर्थिक गणितंच विसकटलं.
अशात खर्च जास्त असल्याने इंजिनिअरिंगमध्ये पुढं शिकणं अशक्यप्राय: झालं. मग काय करायचं तर, लहानपणापासून चालू असलेला संघर्ष पाहून आणि स्वतः वरच्या विश्वासानं तिने अधिकारी व्हायचं ठरवलं. अशातच तिला इंजिनिअरिंगच्या आधारावर जॉब ही ऑफर झाला.पण आता एवढ्यावर थांबायचं नाही असं ठरवून तिने नोकरीची संधी धुडकावून लावली आणि स्पर्धा परीक्षा देऊन पोलिस निरीक्षक होण्याचा चंग बांधला.
यावेळी खरी परीक्षा होती आई-वडिलांच्या विश्वासाची आणि प्रतिक्षेची, पण अशावेळी लग्नाला येणाऱ्या मागण्यांना नकार देवून त्यांनी ही मुलीच्या ध्येयाला पाठींबा दिला. तबस्सुमचे वडील मन्सूर मुल्ला सांगतात, “ साठच्या दशकात माझी आई उच्च शिक्षित होती. तिला शिक्षण खात्यात चांगल पद ही मिळत होतं, मात्र सासरच्या लोकांनी तिला ते काम करू दिलं नाही. तेव्हा तिने आम्हाला अधिकारी करायचं ठरवलं. पण आम्ही चार भावंडे आणि परिस्थिती बेताची असल्यामुळे आम्हाला ते शक्य झालं नाही."
पुढे ते सांगतात, "आईने आम्हाला ठणकावून सांगितलं होतं, मुलांना चांगल शिकवा आणि अधिकारी बनवा. त्यामुळे तबस्सुम जेव्हा म्हणाली, स्पर्धा परीक्षा करायचीय तेव्हा तिचे इथून मागचे कष्ट आणि प्रयत्न पाहून मी लगेच तिच्या निर्णयाला पाठींबा दिला."
स्पर्धापरीक्षांचे मार्गदर्शन घेण्यासाठी पैसे नव्हते. इस्लामपूरमधील खाजगी अभ्यासिकेत व घरीच अभ्यास करत एमपीएससीच्या चार परीक्षा दिल्या, हा संघर्ष तबस्सुमने सात वर्षे केला. दिवसभरातील थोडाही वेळ वाया न घालवता ती अभ्यासिकेत तिचा वेळ कारणी लावायची.
तबस्सुमला आईवडिलांचा भक्कम पाठींबा होते. या जोरावर ती PSI च्या अंतिम फेरीपर्यंतही पोहचली. तिने एमपीएससीच्या यशाला गवसणी घातलीच होती, पण दुर्दैवान यावेळी तिची पोस्ट एक मार्काने हुकली. याच वेळी Maharashtra Engineering Services साठीची pre सुद्धा ती पास झाली होती.
तबस्सुम म्हणते, “दोन ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यापेक्षा एका परीक्षेवर मी फोकस केला. मात्र यावेळी अनेक नवीन गोष्टींचा समावेश PSI च्या ग्राउंडमध्ये झाला असल्यामुळे, ग्राउंडचा अंदाज चुकला आणि पोस्ट अवघ्या एक मार्कने हातातून निसटली.”
यांनतरच्या संघर्षाबद्दल सांगताना ती म्हणते, “यावेळी मी पूर्णपणे खचले होते. तीन वर्ष एकाच परीक्षेचा अभ्यास करूनही माझ्या हाती पोस्ट नव्हती. माझे मामा,आईवडील या सगळ्यांनी मला चांगली साथ दिली आणि जवळजवळ सहा महिन्यानंतर मी पुन्हा नव्याने अभ्यासाला लागले.”
तबस्सुम मुल्ला सांगते, “मी स्वतःचा आत्मविश्वास बळकट केला व सरळसेवा परीक्षा देण्याचा निर्धार केला. यात पहिल्याच प्रयत्नात ग्रामविकास अधिकारी पदाची परीक्षा पास झाले. पण तरीही मी भविष्यात क्लासवन अधिकारी होण्याचा आत्मविश्वास बाळगला आहे.”
तबस्सुमने दिलेली ही परीक्षा सरळसेवेद्वारे आयोजित केली जाते. ग्राम विकास अधिकारी या पदाच्या अंतर्गत अधिकारी गावांमध्ये विविध विकास योजनांची अंमलबजावणी करतात. यामध्ये ते ग्रामसभा आयोजित करणे, स्थानिक सरकारशी संबंधित कार्ये पार पाडणे व ग्रामीण जनतेच्या समस्यांचे निराकरण करणे यासारखे कामे करतात.
तबस्सुमने रडत बसण्यापेक्षा लढणे पसंत केले. तिचा हा प्रवास तरुण पिढीला दिशा देणारा व परिस्थितीशी संघर्ष कसा करावा हे दाखवणारा आहे. तिच्या यशात आई-वडिलांसोबत गावकरी, शिक्षक व नातेवाईकांचे प्रोत्साहन मोलाचे ठरल्याचे तिने सांगितले.
लेकीने मिळवलेल्या या यशाबद्दल ‘आत्तापर्यंत घेतलेल्या सगळ्या कष्टाचं चीज झालाय’अस म्हणत, मन्सूर मुल्ला आपल्या आनंदाश्रुना वाट मोकळी करून देतात. त्याचबरोबर सर्व पालकांनाही संदेश देत ते म्हणतात, “शिकलेली आई घराघराला पुढे नेई, हा सुविचार फक्त शाळेच्या भिंतीवर लिहिण्यासाठी नाही, तर सर्वांनी त्याच गांभीर्य लक्षात घेवून मुलींना शिकवलं पाहिजे.”
पुढे ते म्हणतात “समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील म्हणून जर आपण मुलींना शिक्षणापासून थांबवायला लागलो, त्यांच्यावर बंधन घातली तर त्यांना समाजाचा अनुभवच येणार नाही. आणि जर हा अनुभव त्यांना आला नाही तर त्या समाजात जगायचं शिकणार कशा?”
मन्सूर मुल्ला तबस्सुमला जोपर्यंत शिकण्याची इच्छा आहे तोपर्यंत तिच्या पाठीशी उभे राहणार आहेत. तसेच सर्व पालकांनीही आपल्या मुलींच्या पाठीशी उभं राहण्याची गरज असल्याच ते सांगतात.
एवढ्या हलाखीच्या परिस्थितीतही मानसिक, सामाजिक ताण-तणाव सहन करत तबस्सुम यशापर्यंत पोहचली. तरीही ती आपल्या परिस्थितीला कसलाही दोष देत नाही. तबस्सुम म्हणते “परिस्थिती माणसाला घडवत ही नाही आणि बिघडवत ही नाही.”
ती म्हणते “माणूस स्वतःच स्वतःला घडवतो आणि बिघडवतोसुद्धा. परिस्थिती हे केवळ कारण आहे. शेवटी माणूसच आहे त्याच्या जीवनाचा शिल्पकार.” अपयश ही यशाची पहिली पायरी असते, त्यामुळे अशावेळी खचून न जाता लढण्याची तयारी ठेवली पाहिजे. हाच संदेश तबस्सुम आपल्या संघर्षमय प्रवासातून देते. तबस्सुमच्या या जस्ब्याला आवाज मराठीचा सलाम आणि तिच्या पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा !