‘शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’ असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. शिक्षणामुळे माणसाचं व्यक्तिमत्त्व घडत असतं. विचार करण्याच्या क्षमतेपासून निर्णय क्षमतेपर्यंत व्यक्तिमत्व घडवण्यात शिक्षण मोलाची भूमिका बजावतं.शिक्षित लोकं समाजाला पुढं घेऊन जातात. महाराष्ट्र लोकसभा आयोगाकडून न्यायिक परीक्षा घेण्यात आली. नुकताच या परीक्षेचा निकाल लागला. राज्यातील ११४ विद्यार्थ्यांची न्यायिक (दंडाधिकारी) म्हणून निवड करण्यात आली. यामध्ये चर्चेचा विषय ठरली ती राज्यातील पाच मुस्लिम विद्यार्थी.
मुस्लिम समाजातून येणाऱ्या पाच विद्यार्थ्यांनी MPSC कडून घेण्यात येणाऱ्या जेएमएफसी (JMFC) परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. JMFC परीक्षा अत्यंत कठीण मानली जाते. या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी तयारी करतात. या परीक्षेत शेख तन्वी रहमान, शुमैला सदफ सोहेल अहमद, मुलाणी अशफाक शाहजहान, शेख शिरीन लाला आणि उझेर अहमद शेख नसीर यांनी यश मिळवल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
‘हे’ आहेत पाच मुस्लिम न्यायाधीश
शेख तन्वी रहमान : (राज्यात ५ वी)
तन्वी रहमान या कोल्हापूर जिल्ह्यातील कदमवाडी गावच्या आहेत. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात जेएमएफसी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. २०२२ मध्ये तन्वीच्या वडिलांचे निधन झाले होते. न्यायिक परीक्षा उतीर्ण होऊन तन्वी यांनी त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.
या यशाबद्दल तन्वी शेख सांगतात, “मला कॉलेजपासूनच न्यायाधीश बनण्याची इच्छा होती. तसा अभ्यासदेखील मी सुरू केला होता. माझ्या या प्रवासात कुटुंबीयांनी, शिक्षकांनी, कोल्हापूर बार असोसिएशनमधील ज्येष्ठ वकिलांनी आणि स्थानिक न्यायाधीशांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले. या सगळ्यांच्या सहकार्याने आणि अभ्यासातील सातत्याने मी आज इथपर्यंत आली आहे.”
त्या पुढे म्हणतात, “मी २०२३ पासून कोल्हापूर विधी सेवा प्राधिकरणात सहायक लोक संरक्षक म्हणून कार्यरत आहे. पण मला ही परीक्षा उत्तीर्ण व्हायचं होतं. ही परीक्षा प्रक्रिया खूप लांबलचक आहे. त्यासाठी दृढनिश्चय आणि सातत्य आवश्यक आहे. माझ्याकडे तो होता. कामातून वेळ काढून मी अभ्यास केला. कठोर परिश्रम घेतले. माझ्या वडिलांना मला न्यायाधीश म्हणून पाहायचं होत. २०२२मध्ये ते आम्हाला सोडून गेले पण मी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. याचा मला आनंद आहे.”
शुमैला सदफ सोहेल : (राज्यात १९ वी)
नांदेडसारख्या भागातून येऊन शुमैला सदफ सोहेल यांनी न्यायाधीश होण्याच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे त्यांनी नांदेडमधील एका उर्दू शाळेतून तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या न्यायिक परीक्षेची तयारी करत होत्या. या परीक्षेत त्यांनी संपूर्ण राज्यात १९ वा क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या आई शिक्षिका तर वडील व्यापारी आहेत.
मुलाणी अशफाक शाहजहान (राज्यात २३ वा)
या न्यायिक परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील अशफाक मुलाणी यांनी राज्यात २३ वा क्रमांक मिळवला आहे. यापूर्वीदेखील अशफाक यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवले होते. त्यावेळी त्यांची निवड हैदराबादमधील एसएफआयओ (Serious Fraud Investigation Office)च्या सहाय्यक संचालक पदी झाली होती. सध्या ते या पदावर काम करत आहेत. या पदावर काम करत असताना कठोर परिश्रमाने त्यांनी न्यायिक परीक्षा पास केली आहे.
शेख शिरीन लाला (राज्यात ३२ वी)
मुळच्या अहमदनगरच्या आणि सध्या पुण्यात राहणाऱ्या शेख शिरीन लाला यांनी देखील या परीक्षेत यश मिळवले आहे. या यशाचे श्रेय त्यांनी वडील आणि त्यांचे शिक्षक अॅड गणेश सिरसाठ यांना दिले आहे. त्यांचे पती पुण्यात चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करत आहेत.
उझेर अहमद शेख नसीर (राज्यात ७३ वा)
अकोल्यातील प्रसिद्ध वकील उझेर अहमद शेख यांनी ही परीक्षा पास केली आहे. मुर्तिजापूर ट्रायल कोर्टापासून ते मुंबई उच्च न्यायालयापर्यंत त्यांनी विविध विषय हाताळले आहेत. उझैर यांनी संवैधानिक कायद्यात एलएलएम देखील पूर्ण केले. सध्या ते माहिती अधिकारात काम करत आहेत. त्यांचे वडील एन. एन. शेख हे एक वरिष्ठ वकील आहेत. त्यांनी तब्बल ४० वर्षे प्रैक्टिस केली आहे. तर उझैर यांच्या आई डॉ. रिझवाना मुख्याध्यापिका म्हणून काम करत आहे.
जेएमएफसी (JMFC) परीक्षा काय आहे.
JMFC परीक्षेविषयी
जेएमएफसी म्हणजेच दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आयोजित करते. ही परीक्षा महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेत (Judiciary) काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे. या परीक्षेद्वारे महाराष्ट्र राज्यात दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते. या परीक्षेला महाराष्ट्र न्यायिक सेवा परीक्षा किंवा दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) परीक्षा असंही म्हणतात.
परीक्षा कशी घेतली जाते?
जेएमएफसी परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते.
प्राथमिक परीक्षा : या टप्प्यात उमेदवारांचं सामान्य कायदेशीर ज्ञान आणि योग्यता तपासली जाते. ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते.
मुख्य परीक्षा : मुख्य परीक्षेत कायदेशीर विषयांवर सखोल चाचणी घेतली जाते. ही परीक्षा ऑफलाइन घेतली जाते आणि यात वर्णनात्मक प्रश्न विचारले जातात.
मुलाखत : मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जातं. यात उमेदवारांचं व्यक्तिमत्त्व, कायदेशीर ज्ञान आणि निर्णयक्षमता तपासली जाते.
परीक्षेसाठीची पात्रता
जेएमएफसी परीक्षेसाठी खालील पात्रता निकष पूर्ण करणं आवश्यक आहे:
उमेदवाराचं वय २१ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावं. (आरक्षित प्रवर्गासाठी वयात सवलत मिळते.)
उमेदवाराकडे कायद्याची पदवी (LLB) किंवा त्याला समकक्ष अशी पदवी असणं गरजेचं आहे.
२०२२ मध्ये एमपीएससीने भरतीची जाहिरात प्रकाशित केली होती. यानंतर अनेक विद्यार्थ्यानी या जाहिरातीकडे आकर्षित होत परीक्षा अर्ज दखल केले होते. तिन टप्प्यात होणाऱ्या या परीक्षेसाठी १२,००० हून अधिक विद्यार्थी बसले होते. यातील मुख्य परीक्षेसाठी राज्यातून १,१५० विद्यार्थी पात्र ठरले. मुख्य परीक्षेनंतर २९ मार्च २०२५ ला झालेल्या मुलाखतींसाठी ३५० उमेदवारांची निवड करण्यात आली. यानंतर ११४ विद्यार्थ्यांची न्यायिक दंडाधिकारी (कनिष्ठ विभाग) म्हणून नियुक्तीसाठी निवड करण्यात आली. अधिकृतपणे त्यांची न्यायालयीन भूमिका स्वीकारण्यापूर्वी त्यांना पुढील प्रशिक्षण देण्यात येणार आहेत.