ख्वाजा तांबोळी : महाराष्ट्रीय उद्योजकाची भारतभर धूम

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 12 h ago
क्रिकेट बॅट बनवताना युवा उद्योजक ख्वाजा तांबोळी
क्रिकेट बॅट बनवताना युवा उद्योजक ख्वाजा तांबोळी

 

प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जिथून प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य बदलते. परिस्थिति सर्वांना संधी देत. त्या संधीचे सोनं काहीच लोक करतात. सातत्याने प्रयत्न केले, प्रामाणिक कष्ट केलं तर नक्कीच यश मिळते. या गोष्टी साध्य केल्यात उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील सर्वसामान्य कुटुंबातील ख्वाजा तांबोळी याने. ख्वाजाने आपल्या कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर स्वप्नांना आकार दिला आहे. आईसोबत मिळून त्याने टेनिस बॉल क्रिकेट बॅटच्या व्यवसाय सुरू केला आणि त्यात आपली ओळख निर्माण केली आहे. या लेखातून युवा उद्योजकांसाठी प्रेरणादायी असणारा ख्वाजा तांबोळीचा प्रवास जाणून घेणार आहोत.  

ख्वाजाचा सुरुवातीचा प्रवास 
‘कहीं पोहचने के लिए कहीं से निकलना पड़ता है’ या डायलॉग प्रमाणे कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणे महत्वाचे असते. ख्वाजा त्याच्या सुरुवातीच्या प्रवासाबद्दल बोलताना म्हणतो, “प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर मी कॉलेजमध्ये बीएससी ला ऍडमिशन घेतले. मी बीएससी केमिस्ट्री मधून केले आहे. आमची घरची परिस्थिती हालाकीची होती. गेल्या १४ वर्षांपासून वडील काम करत नसल्याने आईने कुटुंब सांभाळले. मला कोणतही काम करून पैसे मिळवायचे होते. आईला हातभार लावायचा होता.” 

पुढे तो म्हणतो, “मला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. त्यामुळे क्रिकेट टूर्नामेंट पाहायला जायचो. त्यामुळे खेळाडूंच्या बॅटचे आकर्षण असायचे. माझं शिक्षण बीएससी मधून झाल्यानंतर मला केमिकल्सची एलर्जी तयार झाली. त्यामुळे मी नोकरी करू शकत नव्हतो. मी या फिल्डमध्ये येण्याचा कोणताही विचार केला नव्हता. घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे मला फक्त काम हवं होतं. कुठून तरी सुरुवात करायची म्हणून मी ग्रामपंचायतमध्ये गाळा घेण्याचा विचार केला. ग्रामपंचायतीने देखील सहकार्य करून मला गाळा दिला. मी अचानकपणे स्पोर्टचे दुकान टाकायचे ठरवले. आईने कुटुंबाचा उदरनिर्वाह करून काही पैसे जमवले होते. आईला माझ्यावर विश्वास होता. आईने सगळे जमा केलेले पैसे मला व्यवसाय करण्यासाठी दिले. या दुकानातून मी ट्रॅक पॅन्ट टी-शर्ट आणि विविध कंपन्यांचे बॅट्स विकायचो.”

कौटुंबिक परिस्थिति आणि स्वप्न 
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा गावात ख्वाजा कुटुंबियांसोबत राहतो. ख्वाजाचे वडील अजमोद्दीन तांबोळी यांचा माळा, दागिने गठवण्याचा व्यवसाय करायचे. १४ वर्षांपूर्वी त्यांना मानसिक आजाराचे निदान झाले. तेव्हापासून ते काम करत नाही. तर ख्वाजाची आई किरकोळ गृहोपयोगी वस्तू आणि आठवडे बाजार करते. याविषयी बोलताना ख्वाजा म्हणतो, “माझी कौटुंबिक परिस्थिति ठीक असली तरी मी खूप बघितली आहे. वडील आजारी असल्याने ते काम करू शकत नाही. आई एकटीच काम करते. तिने पहिल्यापासूनच खूप कष्ट केले आहे. माझं शिक्षण सुरू असताना मी मिळेल ते काम करायचो आणि मदत करण्याचा प्रयत्न करायचो. सध्या मी देखील काम करत आहे.” 

पुढे त्याने सांगितले, “गरीब आहे म्हणून स्वप्न बघतली नाही असे झाले नाही. उघड्या डोळ्यांनी मी काही स्वप्न बघितली आहेत. सर्वांनी स्वप्न बघितलीच पाहिजे. ती स्वप्न पूर्णकरण्यासाठी आशावादी न राहता प्रयत्नशील राहिले पाहिजे. प्रामाणिक कष्ट केले तर नक्कीच आपली स्वप्न पूर्ण होतील.”  

अडचणींवर मात करत व्यवसायाला सुरुवात 
कोणताही व्यवसाय सुरू करताना प्रत्येक गोष्टीचा सर्वांगाणी विचार करायला हवा. व्यवसाय करताना अनेक अडचणींना समोर जावे लागते. त्या अडचणींवर मात करत आपल्या ध्येयाकडे सरसावणे आवश्यक आहे. व्यवसायाच्या सुरुवातीविषयी बोलताना ख्वाजा म्हणतो, “आईने पैसे दिले आणि मी 'केटी बॅटस्' नावाने व्यवसायाची सुरुवात केली. बॅट विकू लागलो. त्यावेळी मला काही मोठ्या कंपन्यांनी जास्त क्वांटिटी घेतली तरच आम्ही तुम्हाला माल देऊ असं सांगितलं. परंतु माझ्याकडे त्यावेळी पैसे नव्हते. पैशामुळे खरं तर खूप अडचणी यायच्या. दुकानातील माल मला वाढवायचा होता. पण मी काहीच करू शकत नव्हतो.”

पुढे तो सांगतो, “दुकान वाढवण्यासाठी पैसे कमवायचे होते. त्यामुळे मी टी-शर्ट प्रिंटिंगचे काम सुरू केले. सणावारांच्या निमित्ताने विविध मंडळ मला टी-शर्ट प्रिंटिंगसाठी द्यायचे त्यातून मला फायदा झाला. त्यावेळी मी विचार केला की मी स्वतःच एक स्टिकर बनवून विकणार. (बॅटवर लावणारे कंपनीचे स्टीकर)  मग मी स्टिकर नसलेले बॅट्स घेऊन त्यावर माझा स्वतःचा स्टिकर लावायचो. त्यात अडचण अशी झाली की ग्राहकांना पाहिजे तशा बॅट तयार होत नव्हत्या. त्यामुळे पैसे मिळत नव्हते. परिणामी माल विक्री होत नव्हता.” 

शेवटी तो म्हणाला, “मला मोठ काम करायचे होते. मार्केटमध्ये ग्राहकांना हव्या तशा बॅट तयार होत नव्हत्या. मग मी स्वतःचेच मशीन घेऊन स्वतःच बॅट तयार करण्याचा विचार केला. त्या विचारला पैशांनी काही प्रमाणात चौकट निर्माण केली. पण मी मार्ग काढला, पैसे जुळवले आणि कश्मीरला गेलो. त्या ठिकाणी काही दिवस राहिलो. चांगल्या बॅट्स तयार करण्यासाठी लागणारी विविध लाकडं तिथं मी पहिली. बॅट बनवण्याचे मशीन कशी चालवायची हे शिकलो. मग मी गावाकडे आलो आणि मशीन घेतली. मी स्वतः बॅट तयार करायला लागल्यानंतर सुरुवातीपासूनच मला ग्राहकांची साथ मिळाली. माझ्या स्वतःच्या बॅट्सची विक्री वाढायला लागली आणि खऱ्या व्यवसायास सुरुवात झाली.”  

ख्वाजाची आई राशद या व्यवसायाविषयी म्हणतात, “मुलाला क्रिकेटची आवड लहानपणापासूनच होती. लहानपणापासूनच कष्ट करून जमेल तशी मदत करायचा. त्याची जिद्द पाहूनच आयुष्यभराची कमाई त्याच्या बॅट तयार करण्यासाठी आवश्यक वस्तू घेण्यासाठी दिली. त्याचा पुरेपूर उपयोग करून ख्वाजानेही माझा विश्वास सार्थ ठरवला याचे समाधान आहे. त्याला अजून यश मिळो ही इच्छा आहे.” 

व्यवसायाला अभ्यास महत्वाचा 
व्यवसाय करायचा म्हणलं की त्यासाठी अभ्यास आलाच. ख्वाजानेही व्यवसाय सुरू करण्याआधी अभ्यास केला होता. याविषयी बोलताना तो म्हणतो, “सुरुवातीला सांगितल्या प्रमाणे की क्रिकेटची आवड होती. त्यामुळे मी विविध ठिकाणी क्रिकेटचे सामने पाहायला जायचो. सध्या मार्केटमध्ये बॅट्स बनवणाऱ्या नामांकित कंपन्या आहेत. सर्वांनाच माहित आहे की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काही आयकॉन प्लेयर असतात. त्यांच्याकडे विविध कंपन्यांच्या बॅट्स असतात. मी त्या बॅट्स बघायचो. त्याचा स्कुप कसा आहे त्याचा विचार करायचो. कंपनीने तयार केलेल्या बॅट्समध्ये आणि माझ्या बॅट्स मध्ये काय फरक आहे ते बघायचो. खेळाडूंसाठी किती वजनाच्या बॅट आवश्यक असतात आणि कोणते खेळाडू कोणती बॅट घेतात  याचा देखील मी अभ्यास करायचो.” 

खेळाडूंच्या शैलीप्रमणे मिळतात बॅट 
ख्वाजाने तयार केलेल्या बॅट महाराष्ट्रासह कर्नाटक, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड यांसारख्या राज्यातील खेळाडूंच्या आवडीच्या आहेत. खेळाडूंना त्यांच्या मनाप्रमाणे बॅट तयार करून दिल्या जातात. याविषयी तो म्हणतो, “मी अभ्यास केला त्यावेळी मला समजले खेळाडूंना विविध प्रकारच्या बॅट्स लागतात. सांगायचे झाल्यास खेळाडू ग्राऊंडच्या सर्व दिशेला म्हणजे ३६० डिग्रीमध्ये खेळत असेल तर त्याला ९७० ग्रॅम वजनाची बॅट आवश्यक आहे. तशी ९७० ग्रॅम वजनाची बॅट सर्व खेळाडू वापरू शकतात. खेळाडू फक्त ग्राऊंडच्या व्ही शेपमध्ये खेळत असेल तर त्याला १०३० ते १०५० ग्रॅम वजनाच्या आतील बॅट पाहिजे. त्यामध्ये त्यांच्या बॅटचा खालच्या भागात वजन असणे आवश्यक आहे.”

पुढे तो म्हणतो, “ मी गरीबी पाहिली आहे. काही वेळा खेळाडू घरी बसतात त्यांच्याकडे नवीन बॅट्स घेण्यासाठी पैसे नसतात. काही खेळाडूंकडे जर पैशांची कमी असेल तर मी त्यांना कमी पैशात बॅट देतो. पैसे नसल्याकारणाने मी कोणालाही अडवत नाही. होतकरू खेळाडूंना मी स्वतःच्या स्टिकरच्या बॅट देतो. नुकताच मी गुजरात मधील एका खेळाडूला प्लेयर एडिशन बॅट दिले आहे.” 

व्यवसायाची परिस्थिति आणि भविष्य 
व्यवसायाची सद्य परिस्थिति आणि भविष्याबद्दल विचारले असता तो म्हणतो, “बॅट्स तयार करण्यासाठी मी कश्मीर मधून कच्चामाल आणतो. सध्या महिन्याला माझ्या १०० ते २०० बॅट्स ची विक्री होते. माझ्याकडे २००० पासून पुढे बॅट्स आहेत. यामध्ये ‘केटी एडिशन’ आणि ‘प्लेयर एडिशन’ मधील बॅट साडेतीन हजार, गोल्ड एडिशन मधील बॅट ३००० पर्यंत आहे.” 

पुढे ते म्हणतात, “येणाऱ्या काळात देशभरातील विविध राज्यात माझ्या बॅट्स असाव्यात. मला स्वतःचा ब्रँड बनवायचा आहे.  'केटी बॅटस्'चे सर्व राज्यात स्टोर पाहिजे. हे माझं स्वप्न आहे.” 
 
- फजल पठाण 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter