प्रेमाच्या प्रतिकातून फुलवला उद्योजकतेचा मळा

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
गुजरातमध्ये गुलाबाची शेती करणाऱ्या शमशाद हुसेन आणि त्यांचे दिवंगत पती झाकीर हुसेन
गुजरातमध्ये गुलाबाची शेती करणाऱ्या शमशाद हुसेन आणि त्यांचे दिवंगत पती झाकीर हुसेन

 

भक्ती चाळक
 
फेब्रुवारी म्हणजे प्रेमी युगलांसाठी प्रेम व्यक्त करण्याचा महिना. आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा ‘व्हॅलेंटाईन वीक’ सुरु आहे. आजकालच्या तरुणांमध्ये हा आठवडा साजरा करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात दिसून येतो. व्हॅलेंटाइन वीकमधला पहिला दिवस असतो तो ‘रोझ डे’चा. या दिवशी जोडपी आपल्या जोडीदाराला गुलाबाचे फूल देतात आणि मनातल्या भावना व्यक्त करतात. प्रेमाचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या या गुलाबांमुळे अनेक संसार फुलले आहेत. परंतु गुलाबामुळे एखादे कुटुंब वसल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? चला तर जाणून घेऊयात या विशेष लेखातून…

गोष्ट आहे २०१३ वर्षातली. गुजरातच्या झाकीर हुसेन यांना कौटुंबिक गैरसमजांमुळे आपल्या घराबाहेर पडावे लागले होते. त्यांची पत्नी शमशाद झाकीर हुसेन मुल्ला आणि आपल्या तीन मुलांसह त्यांनी फक्त अंगावरच्या कपड्यांवर घर सोडले. त्यांनतर वडिलोपार्जित मिळालेल्या जमिनीच्या तुकड्यावर त्यांनी आपला संसार थाटला. जमिनीच्या काही भागात घर बांधले तर उर्वरित भाग शेतीसाठी वापरला. 

झाकीर यांचा संघर्ष इथेच संपला नव्हता. पुढील काही वर्षे त्यांच्यासाठी खूप कठीण गेली. अगदी कुटुंबाचे खर्च चालवणे सुद्धा अवघड जात होते. अशा परिस्थितीत झाकीर आणि शमशाद यांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार करण्यास सुरुवात केली. 

सुरुवातीच्या काळात २५ गुंठा जमिनीवर त्यांनी शेतीचे अनेक प्रयोग केले. पारंपारिक सेंद्रिय पद्धतीने पालेभाज्या-फळभाज्यांचे उत्पादन सुरु केले. त्या भाज्या पिकवून बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असत. त्यांनी अनेक वर्षे हा व्यवसाय केला. परंतु यामध्ये म्हणावा तेवढा नफा मिळत नसल्याने त्यांनी गुलाबाची शेती करण्यास सुरुवात केली. फक्त गुलाबाची शेतीच नाही तर गुलाबापासून ते विविध उत्पादने देखील तयार करू लागले. 

पारंपारिक शेतीचे रुपांतर व्यवसायात करण्याच्या निर्णयावर शमशाद सांगतात, “आमच्या शेतीत दोन देशी प्रकारच्या गुलाबाच्या झाडांचा उत्पादन होते. मी २०१४ पासूनच गुलाबाच्या फुलांपासून माझ्या मुलांसाठी गुलकंद तयार करत होते. मी झाकीर यांच्याकडे कल्पना मांडली की, आपण याचे रुपांतर व्यवसायात देखील करू शकतो.”

त्या पुढे म्हणतात, “ आम्हाला शंका होती की, आमचे घरगुती उत्पादन बाजारात यशस्वी होऊ शकेल का? कारण ही नवीननवीन आम्हाला ही उत्पादने तयार करण्याची योग्य पद्धत माहिती नव्हती. किंवा त्याचे आरोग्यविषयक वैज्ञानिक फायदे काय आहेत याबद्दलही माहिती नव्हती. झाकिर यांनी आमच्या कुटुंबातील एका डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांनी गुलकंद खाण्याचे फायदे सांगितले. त्यानंतर आम्ही विचार केला की, जर हे सर्व उत्पादन यशस्वी झाले तर ते लोकांच्या आरोग्याचे फायदेशीर ठरतील. मग आम्ही या व्यवसायात उतरलो.”

 
हुसेन दाम्पत्याने २०१७ मध्ये सुरु केलेला हा व्यवसाय आज एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलाय. ‘शमा ऑर्गेनिक प्रोडक्ट’ नावाने त्यांचा हा व्यवसाय सुरु आहे. आज झाकीर या जगात नसले तरी त्यांची पत्नी आणि मुलगा हा व्यवसाय सांभाळत आहेत. पारंपारिक व्यवसायाला डिजिटल स्वरूप देण्याचे काम त्यांचा मुलगा मुल्ला मोहोम्मद हंजला झाकीर हुसेन हा करत आहे. 

‘आवाज मराठी’सोबत बोलताना मोहोम्मद हंजला यांनी शेतीविषयी अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “गुलाबाच्या शेतीचा व्यवसाय माझ्या आई-वडिलांनी २०१७ मध्ये सुरु केला. सुरुवातीला आम्ही १००० गुलाबी गुलाब ज्याला आपण इंडियन रोज म्हणतो त्याचे उत्पादन केले. आणि आत्ता आमच्याकडे जवळपास ४००० हून अधिक गुलाबांची झाडे आहेत. आम्ही हा व्यवसाय अजून पुढे नेण्याच्या प्रयत्नात आहोत”

ते पुढे म्हणतात, “आम्हाला व्यवसायासाठी अधिकाधिक फुलांची गरज भासत आहे. त्यामुळे माझ्या मामाच्या शेतीत सुद्धा आम्ही गुलाबाचे उत्पादन घेतले आहे. ती शेती सुद्धा १००% सेंद्रिय आहे. आत्ता आमच्याकडे ६० ते ७० प्रकारची आयुर्वेदिक वनस्पती आहेत. त्यामध्ये तुळस, महाभृंगराज, शतावरी, आवळा, कडुलिंब यासारख्या वनस्पतींचा समावेश आहे.

गुलाबाची शेती आणि त्यापासून मिळणारी विविध उत्पादने याविषयी सांगताना मोहोम्मद हंजला म्हणतात, “आमच्याकडचे बनणारा गुलकंद ही आमची खासियत आहे. सुरुवातीला आम्ही केवळ गुलाब आणि खडीसाखरेचा गुलकंद तयार करायचो, परंतु आम्ही त्यात वेगवेगळे प्रयोग केला. आता आम्ही विविध फ्लेवरचे गुलकंद तयार करतो. त्यामध्ये बडीशेप गुलकंदला बाजारात जास्त मागणी आहे.”

ते पुढे म्हणतात, “अनेक लोकांचा गैरसमज आहे की गुलकंद हा मधापासून तयार होतो. परंतु मी त्या लोकंना सांगू इच्छितो की, गुलकंद हा मधात तयार केला जाऊ शकत नाही. कारण मधाचा गुणधर्म उष्ण असतो आणि गुलाबाचा थंड. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचे एकत्रित मिश्रण होऊच शकत नाही. थंड आणि गरम गोष्ट एकत्र आल्यावर त्याचे केमिकल रिअक्शन होऊ शकते ज्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.”
 
केवळ गुलकंदच नाही तर ते सौंदर्य प्रसादाने सुद्धा तयार करतात. याविषयी बोलताना मोहोम्मद हंजला सांगतात, “आमच्याकडे तयार होणारी सौंदर्य प्रसादाने सुद्धा १००% नैसर्गिक असतात. आम्ही वाफेपासून गुलाबजल तयार करतो. बाजारात मिळणारे गुलाबजल खूप सुगंधी असते परंतु त्यामध्ये अनेक रसायनांचा वापरत केलेला असतो, त्यामुळे त्वचेला त्रास होतो.”

ते पुढे म्हणतात, “आम्ही हेअर ऑइल, अंगाचे साबण, चेहऱ्यावर लावण्याचे फेसपॅक सुद्धा तयार करतो. आम्ही २ प्रकारचे तेल तयार करतो. एक गुलाबापासून आणि दुसरा आयुर्वेदिक वनस्पतींपासून. आमच्याकडे तयार केल्या जाणाऱ्या तेलांना सुद्धा भारतभरातून मोठी मागणी आहे.”
 

व्यवसायाचे डिजिटलायजेशन
कोणताही बिझनेस करताना व्हिजन असणे आवश्यक आहे. उद्योग, व्यवसायाला सुरुवात करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे या सर्वाची मानसिक तयारी आवश्यक आहे. त्यासोबतच जो व्यवसाय करायचा आहे त्याचा अभ्यास असणे देखील तितकेच आवश्यक आहे. मोहोम्मद हंजला यांनी व्यवसायात उतरण्यापूर्वी केलेल्या तयारी बद्दल सांगितले. 

व्यवसायाचे मार्केटिंग करण्याविषयी मोहोम्मद हंजला म्हणतात, “माझ्या आई-वडिलांनी या व्यवसायाची सुरुवात केली. या कामातून त्यांना फायदा देखील मिळाला आहे. मी आता या व्यवसायात आलो आहे. परंतु कोणताही व्यवसाय करण्यासाठी आधी त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. घरचा व्यवसाय असून देखील मी याविषयाचा सखोल अभ्यास केला. हा अभ्यास करत असताना मी बाजारात गेलो. तज्ञ लोकांशी बोललो आणि व्यवसायाबद्दल योग्य ते मार्गदर्शन देखील घेतले. मला या पारंपारिक पद्धतीने चालत आलेल्या व्यवसायाला मला डिजिटल स्वरूप द्यायचे आहे. त्यासाठी मी प्रयत्न करत आहे.”

ते पुढे म्हणतात, ‘व्यवसायाविषयीचा अभ्यास करताना मला जाणवले की, आम्ही चांगले उत्पादन तयार करतो, लोकांना पण ते आवडतात. परंतु वस्तूंचा खप वाढवणे आवश्यक आहे. व्यवसाय करताना उत्पादनांचे ब्रँडिंग करणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आता मी ब्रँडिंगवर जास्त जोर दिला आहे. अमेझॉन, मिशो सारख्या संकेतस्थळांवर माझी उत्पादने आणली. ज्याचा फायदा ग्राहकांना देखील होत आहे.”

- भक्ती चाळक
([email protected])

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter