दिव्यांग म्हटलं की त्यांच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहिले जाते. मात्र दिव्यांगत्व हे शरीराला आलेले असते, त्यामुळे अशा व्यक्तीमध्ये आत्मविश्वास भरला, त्यांना आधार दिला तर हे दिव्यांगत्व मानसिक पातळीवर जात नाही. जिद्दीच्या पंखांनी आकाश कवेत घेण्याचं स्वप्न डोळ्यात कोरून दिव्यांग व्यक्ती लढण्याचा प्रयत्न करतात. लातूरच्या गौस शेखची काहीशी अशीच कहाणी आहे.
लातूर शहराच्या नजीक असलेलं महापूर हे गौसच गाव. वडील आश्रमशाळेत सेवक तर, आई गृहिणी आहे. गौस हे त्याच्या आई-वडिलांचं पहिलच अपत्य. जन्माला आल्यानंतर त्याला दोन्ही हात नव्हते. परंतु अल्लाहाची दिलेली सुरेख भेट समजून त्याच्या आई-वडिलांनी त्याला आहे तसे स्विकारले आणि मायेने संगोपन केले. स्वतः नोकरीस असलेल्या शाळेत गौसच्या वडिलांनी त्याला प्रवेश दिला.
गौसच्या वर्गातील इतर मुले हाताने लिहायची परंतु गौसला नसल्यामुळे त्याच्या वडीलांनी आणि शिक्षकांनी त्याच्या पायाच्या बोटात पेन्सिल देऊन त्याला लिहायला शिकवले. पाहता पाहता गौस लिखाणात पारंगत झालाच परंतु, कोणालाही हेवा वाटावा असे त्याचे हस्ताक्षर आहे. फक्त लिहिण्यातच नाही तर तो अभ्यासातही हुशार आहे. वर्गात पहिला येण्याचं सातत्य त्यांन आजही राखल आहे. दहावीत ८९ टक्के तर बारावीमध्ये विज्ञान शाखेत ७८ टक्के मिळवत त्याने यश पटकावले. सध्या तो लातूरच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कला शाखेच्या प्रथम वर्षाची परीक्षा देत आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ दिला जातो, शिवाय लेखनिक ही घेता येतो परंतु, गौसने ही सवलत एकदाही घेतली नाही. उलट अधिकच्या पुरवण्या घेत त्याने इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अगदी तीन तासातच पेपर सोडवले आहेत. गौसचे सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न असून त्याची तयारी त्याने आतापासून सुरू केली आहे. त्यासाठी तो कठोर परिश्रम देखील घेत आहे.
आई-वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना गौस म्हणतो, “आई वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवणाऱ्यांची पावलं आडवाटेला जात नाहीत तर, ती योग्य दिशेने योग्य मार्गावर आपणास नेतात. स्वत: ऊन पाऊस झेलून तुम्हाला सावली पुरवणाऱ्या आई-वडिलांना दुखवू नका.”
पुढे तो म्हणतो, “याविषयी बोलताना गौस म्हणाला, “मला हात नसल्यामुळे मला अंघोळ घालणे, जेवण खाऊ घालणे ही कामे आई-वडील करतात. परंतु, शक्य तितकी कामे मी स्वतः करतो. चमचाने खाता येतील, असे पदार्थ मी स्वतः पायाचा वापर करून खातो. मोबाइलसुद्धा पायाचा वापर करून चालवतो. हात नाहीत म्हणून माझ्या मनात कसलीही खंत नाही. मी दहावीला आणि बारावीला चांगले गुण घेऊन दिव्यांग विभागात शाळेत प्रथम आलो होतो. आता पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी होण्याचे माझे ध्येय आहे.”
आपल्याकडे एखादी गोष्ट कमी आहे म्हणून रडत बसणार्यांपैकी गौस नाही. तो आयुष्यात काहीतरी करुन दाखवायचे आहे या विचाराने पुढे जात आहे. याविषयी भावना मांडताना तो म्हणतो, “मला दोन्हीही हात नाहीत म्हणून मी रडत बसलो नाही. पायाच्या बोटांचा वापर करून लिहिण्याचा सराव केला. यासाठी कुटुंबीयांनी, शिक्षकांनी मला प्रोत्साहित केले. सरावातील सातत्यामुळे मी पायाच्या बोटात पेन पकडून लिहू लागलो. माझे वळणदार अक्षर पाहून शिक्षकांनी मला चित्र काढण्याचा सल्ला दिला. त्यामुळे फावल्या वेळेत मी पायाच्या बोटात ब्रश पकडून चित्र रेखाटू लागलो. त्यामुळे आज मला व्यक्तिचित्रही रेखाटता येतात. हात नसले तरी मी पायाचा वापर करून क्रिकेटही खेळू शकतो.”
कार्यक्षेत्र कोणतेही असो यशोशिखरावर पोहोचलेल्या माणसाने आपले ध्येय गाठण्यासाठी घेतलेली मेहनत, कठोर परिश्रम यांची गाथाच सर्वांसमोर उभी राहत असते. यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मेहनत, परिश्रमाच्या माध्यमातूनच पुढे जातो, हे गौसने दाखवून दिले आहे. यातूनच त्याने समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे.
- भक्ती चाळक
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -