फजल पठाण
केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात पेरिंथलमन्ना जवळ संथापुरम हे छोटेसे गाव आहे. याच गावातील फातिमा मस्जिद आणि मुस्लिम महिला यांच्यात असणारे अंतर कमी करण्यासाठी कार्यरत आहेत. फातिमा यांच्या कार्यामुळे मस्जिदच्या महल्लू समितीमध्ये महिलांचा समावेश करणारे संथापुरम हे पहिले गाव ठरले आहे. या विषयी माहिती देणारा हा विशेष लेख...
काय आहे महल्लू समिती....
केरळ राज्यात महल्लू प्रणाली अस्तित्वात असून त्याला अद्वितीय स्थान देण्यात आले आहे. विविध मुस्लिम संघटनांद्वारे मस्जिद स्थापित केल्या जातात. या सर्व मस्जिद मिळून महल्लू समिति स्थापन करतात. या मस्जिदीं मुस्लिम पुरुष आणि स्त्रियांच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यामध्ये नमाज, रोजा, लग्न, घटस्फोट, वारसा अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. इस्लाम मध्ये नमाज आणि रोजा अदा करणे मुस्लिम समाजाला अनिवार्य आहे. इस्लामच्या शर्यतीनुसार (कायद्या नुसार) लग्न आणि घटस्फोट घेणे आवश्यक आहे. महल्लू समितिमध्ये महिलांचा समावेश झाल्याने मुस्लिम महिला त्यांची मते या समितिसमोर मांडू शकतात. महल्लू समिति लग्न, घटस्फोट आणि इतर धार्मिक गोष्टींवर मुस्लिमांना मार्गदर्शन करते.
मलप्पुरम मधील संथापुरम नंतर कोझिकोड जिल्ह्यातील ओथयामंगलम आणि शिवापुरम या गावांनीही त्यांच्या महल्लू समित्यांमध्ये महिलांचा समावेश करून घेतला आहे. तसेच कन्नूर जिल्ह्यातील काही जमात-ए-इस्लामी संचालित मस्जिदींचा समावेश देखील महल्लू समिति मध्ये करण्यात आला आहे.
‘जमात-ए-इस्लामी हिंद’ या केरळच्या महिला शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील ६०० मशिदींपैकी ८७ मस्जिदींच्या समित्यांमध्ये मुस्लिम महिला आहेत. या समित्यांच्या माध्यमातून त्या विविध उपक्रम राबवतात.
असा झाला महल्लू समितीमध्ये मुस्लिम महिलांचा समावेश
महल्लू समिती म्हणजे परिसरातील विविध मस्जिद एकत्रित येऊन एक समिति स्थापन करतात. महल्लू समितीमध्ये महिलांच्या प्रवेशाविषयी बोलताना तेथील स्थानिक सांगतात, “मागच्या काळात मस्जिदसाठी चंदा मागण्यासाठी काही मुस्लिम पुरुष केरळच्या संथापुरम या गावात आले होते. यावेळी गावातील फातिमा युटी आणि त्यांच्या काही मैत्रिणींनी या पुरुषांना सहज सांगितले की, तुम्ही नेहमी आमच्याकडे वर्गणी गोळा करण्यासाठी येता. परंतु मस्जिदच्या नित्यक्रमात आमचा समावेश करत नाही.”
पुढे ते म्हणतात, “फातिमा यांच्या त्या शब्दांनी संथापुरम मस्जिदसाठी गोळा करण्यात येणाऱ्या वर्गणीच्या कामात मोठा बदल होईल असे त्यांना स्वतःला देखील वाटले नसावे. याच नंतर महल्लूसाठी वर्गणी गोळा करण्याचे काम मुस्लिम महिलांना देण्यात आले.”
महिला आणि महल्लूसचे उपक्रम
महल्लूच्या विविध उपसमित्या देखील आहेत. महल्लूसचे अनेक उपक्रम या उप-समित्यांतर्गत घेतले जातात. यामध्ये मुस्लिमांसाठी विवाह समुपदेशन आणि स्वयंरोजगारासारख्या समस्यांचे निराकरण करणाऱ्या विविध उपक्रमांचा समावेश आहे. तसेच गरीब मुस्लिम कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत केली जाते. मुस्लिम समाजातील महिलांना शिक्षणात मदत करण्यासाठी महल्लू समिति मध्ये महिला स्वतःहून सहभागी होत आहेत.
ओथयामंगलम महल्लू समितीच्या महिला सदस्य बनूजा वडाक्कुवेटील सांगतात, “कोविडच्या लॉकडाऊनमध्ये बऱ्याच कुटुंबांनी नोकऱ्या गामावल्या होत्या. जगण्यासाठी लोक संघर्ष करत होते तेव्हा आम्ही धर्माची पर्वा न करता त्यांना मोफत अन्न आणि दैनंदिन गरजेच्या वस्तु पुरवल्या आहेत.”
महल्लू समिति आणि महिला
महल्लू समितीमुळे अनेक मुस्लिम महिला समाजकार्यात सक्रियपणे सहभाग घेत आहेत. समाजकार्याविषयी बोलताना कालिकत विद्यापीठाजवळील देवथियाल येथील महल्लू समितीचे सदस्य साल्वा केपी म्हणतात, “ जर आपल्याला समाजकार्यात गुंतायचे असेल तर आपण ते काम करण्याचे मार्ग शोधू शकतो. आम्ही महल्लू समितीचा भाग असलो किंवा नसलो तरीही सामाजिक कार्य करू शकतो. परंतु जेव्हा आम्ही समितीत असतो तेव्हा आमच्याकडे या कार्यासाठी अधिक शक्ती असते.“
महिलांना महल्लू समितिमध्ये प्रवेश मिळवून देणाऱ्या फातिमा म्हणतात, “ महल्लू समित्यांमध्ये महिलांच्या सहभागामुळे महल्लूच्या प्रशासनात अनेक बदल झाले आहेत. महिलांमधील लैंगिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी महल्लू समित्यांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व महत्त्वाचे आहे. तरुण आणि सुशिक्षित स्त्रिया पुढे यायला हव्यात. तरच आणखी बदल घडवून आणता येतील.”
ओथयामंगलम महल्लू समितीच्या महिला सदस्य बनूजा या मुस्लिम महिलांनी महल्लू समितीच्या सहकारी महिलांशी मोकळेपणाने बोलणे, त्यांना आपल्या समस्येविषयी सांगणे आवश्यक समजतात. कारण महिला पुरुषांसमोर मोकळेपणाने बोलत नाहीत.
केरळ उच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरणाच्या वरिष्ठ पॅनेल सदस्य, केंद्र सरकारचे स्थायी वकील आणि केरळ उच्च न्यायालयाचे स्थायी वकील अधिवक्ता शजना मुल्लाथ म्हणतात, “ मस्जिद समित्यांमध्ये महिलांचा समावेश करणे हे लैंगिक समानता आणि धार्मिक संस्थांमध्ये समान सहभाग वाढवण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे. महल्लू तरुण पिढ्यांसाठी एक सकारात्मक उदाहरण म्हणून काम करत आहे.”
मुस्लिम महिलांचा मस्जिदी पर्यंतचा प्रवास....
१९३० च्या दशकात महिलांच्या मस्जिद मध्ये प्रवेशाचा विषय पहिल्यांदा पुढे आला. १९४६ मध्ये मलप्पुरममधील ओथाई गावातील मस्जिदत महिलांनी पहिल्यांदा शुक्रवारच्या नमाजला हजेरी लावली. १९५० मध्ये केरळ नदवाथुल मुजाहिद्दीन या संघटनेच्या स्थापनेमुळे मस्जिदमध्ये महिलांच्या प्रवेशाच्या मागणीला जोर आला. मुजाहिद आणि जमात-ए-इस्लामी या संघटनेने मस्जिदमध्ये महिलांसाठी स्वतंत्र जागा दिली.
२०१५ मध्ये, मुजाहिद/सलाफी संघटना KNM Markazu Da'wa ने महिलांना मस्जिद समित्यांमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करणारा ठराव पास केला होता. या ठरावाची अंमलबजावणी काही मस्जिदींनीच केली. २०२२ मध्ये मस्जिद आणि महल्लूंना त्यांच्या समित्यांमध्ये महिलांचा समावेश करण्याची सूचना करण्यात आली.
केरळच्या फातिमा युटी यांनी मुस्लिम महिलांसाठी मस्जिदींची दारे उघडली नाही तर त्यांना महल्लू समिति मध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. आज त्यांच्या नेतृत्वात हजारो मुस्लिम महिला समजकार्यात सक्रियपणे काम करत आहेत. देशभरातील महिलांनी विशेषतः मुस्लीम महिलांनी फातिमा यांच्या या चळवळीतून प्रेरणा घ्यायला हवी.