बालाघाटच्या फरखंदाने 'अशी' घातली IAS पदाला गवसणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 16 h ago
IAS फरखंदा कुरैशी  आणि तिचे आई वडील.
IAS फरखंदा कुरैशी आणि तिचे आई वडील.

 

‘स्वप्नांना जिद्दीची आणि प्रामाणिक कष्टाची जोड असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करता येऊ शकते’ हे मध्य प्रदेशच्या बालाघाटच्या फरखंदा कुरैशीने सिद्ध करून दाखवलं. नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यश मिळवलं. फरखंदा कुरैशीने यूपीएससी परीक्षेत तिने देशात ६७ वी रँक मिळवत IAS पदाला गवसणी घातली. तिच्या या यशामुळे बालाघाटमध्ये आनंदाचे वातावरण पसरलं आहे.

शालेय शिक्षण घेतानाच बघितलं IAS होण्याचं स्वप्न 
फरखंदाने मिळवलेल्या या यशाने तिच्यावर सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.  या यशाबद्दल सांगताना ती म्हणते, “मी एकदा न्यूज बघत होते. एका न्यूज चॅनेलवर तेव्हा तत्कालीन कलेक्टर बी. चंद्रशेखर यांना काम करताना पाहिलं होतं. ते पाहून मला त्यांच्या सारखं काम करण्याची प्रेरणा मिळाली. तेव्हा मी आठवीत शिकत होते. मी तेव्हाच ठरवलं होत की IAS व्हायचं.” 

 
चौथ्या प्रयत्नात मिळवलं यश 
यूपीएससी परीक्षेच्या तयारीविषयी ती म्हणते, “मी २०२१ पासून यूपीएससीची तयारी सुरू केली. मी याआधी तीन वेळा यूपीएससी परीक्षा दिली. पहिल्या तीन प्रयत्नात मला अपयश आलं. मला खूप वाईट वाटलं पण मी हार मानली नाही. माझ्या या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मला आई वडिलांनी आणि कुटुंबाने मोठं पाठबळ दिलं. मला कायम प्रोत्साहन दिलं. आज मी देशात 67वी रँक मिळवत माझं स्वप्न साकार केलं आहे.” 

अशी केली UPSC ची तयारी
आजवर UPSC परीक्षेची तयारी  करणाऱ्या अनेकांकडून तुम्ही ऐकलं असेल की, १८-१८ तास आम्ही अभ्यास करतो. पण खरचं इतक्या तास अभ्यासाची गरज असते का? याविषयी फरखंदा म्हणते, “मला यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेसाठी १८ तास अभ्यास आवश्यक वाटत नाही. मी रोज ६ ते ८  तास अभ्यास केला. मी माझ्या अभ्यासात सातत्य ठेवलं. गेल्या वर्षांचे पेपर, मानक पुस्तकं, चालू घडामोडी आणि वृत्तपत्रं वाचन केलं. १८ तासांपेक्षा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्वांनी अभ्यासात सातत्य ठेवलं पाहिजे.” 

फरखंदाने बालाघाटच्या सेंट मेरी स्कूलमधून 10वी आणि मेथोडिस्ट मिशन स्कूलमधून 12वी पूर्ण केलं आहे. तिने कधीच छोट्या गावातून येत असल्याचा न्यूनगंड बाळगला नाही. ती सांगते, "मी कोणत्या गावात जन्माला यायचं हे माझ्या हातात नव्हते. मी ज्या गावातून येते ते गाव नक्कीच छोटे आहे. पण ती माझी कमजोरी नाही. गावातील तरुणांना योग्य मार्गदर्शन आणि संसाधनं मिळाली, तर ते देशाच आणि स्वतःचं नाव उज्ज्वल करू शकतात.”  

फरखंदा तीच यश आई-वडिलांना समर्पित करते. तिचे वडील अब्दुल मलिक कुरैशी वकील आहेत, तर आई निकहत अंजुम गृहिणी आहेत. लेकीच्या यशाबद्दल बोलताना अब्दुल मालिक भावून झाले. ते म्हणाले, “तिने तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली आहे. आज लोक मला फरखंदाचे वडिल म्हणून ओळखतात. यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी काहीच नाही."  

विविध स्तरावरून मिळाल्या शुभेच्छा
फरखंदाच्या यशाने बालाघाटमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. याठिकानच्या कलेक्टर मृणाल मीणा यांनी तिची भेट घेऊन तिला शुभेच्छा दिल्या आहेत. स्थानिक अंजुमन कमेटीने तिचा सत्कार करत तिला मुस्लिम समाजासाठी प्रेरणास्रोत मानलं. नगरपालिका अध्यक्ष भारती ठाकुर यांनी तिच्या घरी जाऊन अभिनंदन केलं.  

फरखंदाचं यश केवळ वैयक्तिक विजय नाही, तर सामाजिक बदलाची प्रेरणा आहे. मुस्लिम युवती म्हणून तिची IAS मधील निवड समाजात समावेशकतेचं आणि प्रगतीचं प्रतीक आहे. तिची कहाणी तरुणांना स्वप्नं पाहून ती साकार करण्यासाठी प्रेरणादायी आहे.

- अब्दुल वसीम अंसारी, बालाघाट 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter