“माणसाने माणसासाठी केलेले कर्तव्य म्हणजे धर्मपालन होय... धर्माबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असले तरीही, मानवता हीच सर्व धर्माची शिकवण आहे…” हा विचार उराशी बाळगून पुण्यातील एक मुस्लीम दांपत्य समाजातील दुर्बल घटकांच्या मदतीसाठी पुढे सरसावत आहे.
२०१९ पासून ‘मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशन’च्या माध्यमातून डॉ. फराह अन्वर हुसैन शेख आणि त्यांचे पती अन्वर शेख यांनी समाजकार्याचा वसा घेतला आहे. या संस्थेमार्फत महिलांचे सक्षमीकरण, मुलांच्या हक्कांची रक्षा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि आपत्ती निवारण या क्षेत्रात कार्य करून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा ते प्रयत्न करत आहेत.
सध्या पुण्यातील सततच्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत, मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशनने तात्काळ मदतीचा हात पुढे केला आहे. फाउंडेशनने पूरग्रस्त नागरिकांसाठी २४ तासांची हेल्पलाईन सुरू केली. ज्याद्वारे विशेषत: ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गर्भवती महिलांना तातडीने मदत मिळत आहे.
या कार्याविषयी बोलताना अन्वर शेख सांगतात, “आपत्तीच्या काळात एकमेकांना मदत करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. इस्लाम शिकवतो की संकटात असणाऱ्या व्यक्तींना आधार देणे हे आपले धार्मिक आणि मानवी कर्तव्य आहे. अशा वेळेस आपण आपल्या मदतीचा हात पुढे केला त्या व्यक्तींचे आयुष्य वाचवू शकतो. या काळात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना तातडीची मदत देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अशा मदतकार्यात आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन, एकमेकांना मदत केली पाहिजे.”
आजपर्यंत भारत देश येणाऱ्या संकटांना एकसंघ होऊन धीराने तोंड देत आला आहे. अशा प्रसंगातच ‘माणुसकी’ नावाच्या धर्माचे प्रकर्षाने दर्शन होत असते. त्याचाच प्रत्यय पुणेकरांना फराह फाउंडेशनद्वारे वेळोवेळी होत असतो. अतिवृष्टीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना प्राथमिक जलद मदतीची गरज असते. मग अशावेळी पूरग्रस्तांना संस्थेद्वारे तातडीची मदत पुरवली जाते.
अशाप्रकारची मदत…
- आपत्कालीन परिस्थितीत ५०० मि.ली. पर्यंत मोफत पेट्रोल
- पूरग्रस्तांसाठी मोफत दूध, ब्रेड आणि बिस्किट्सची व्यवस्था.
- संपर्कात राहण्यासाठी मोफत पॉवर बँक आणि चार्जर्स.
- तात्काळ वैद्यकीय मदत आणि प्राथमिक उपचार
तत्काळ मदतीसाठी नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध असलेला हेल्पलाईन क्रमांक - ८४५९८६७८३८
दापोडीत स्थायी असलेली ही सामाजिक संस्था डॉ. फराह अन्वर हुसैन शेख यांच्या नेतृत्वाखाली देशभर काम करते. आपत्कालीन परिस्थतीविषयी बोलताना फराह म्हणाल्या, “या संकटाच्या काळात गरजू पुणेकरांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. आम्ही आमच्या सेवा पुणेकरांच्या पाठीशी ठेवणार आहोत. आमची संस्था आपत्तीच्या काळात कायमच पुणेकरांच्या सोबत आहे आणि आपत्ती निवारणात त्यांची मदत करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार आहे.”
डॉ. फराह अन्वर हुसैन शेख या संस्थेच्या मार्फत अनेकांसाठी मसीहा ठरल्या आहेत. त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल दिल्लीतल्या एका प्रतिष्ठित विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशनने आरोग्य, शिक्षण, आणि आपत्ती निवारण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे.
फराह यांनी विशेषतः मुस्लिम महिलांच्या प्रार्थनेच्या अधिकारासाठी लढा देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मुस्लिम महिलांना मशिदींमध्ये प्रार्थने करता यावी यासाठी केलेल्या लढाईत त्यांचा मोठा सहभाग घेतला आहे. त्यांच्या या कार्याची दखल "Echoes of Equality: Farha Shaikh’s Journey" या पुस्तकात करण्यात आली आहे.
संस्थेमार्फत सुरु असलेले समाजकार्य ही धर्माने दिलेली शिकवण आहे असं म्हणत अन्वर पुढे बोलतात, “सर्व धर्मातील शिकवण मानवता धर्म वाढविणारी असून प्रेम, सौहार्द, बंधुभावाचे बंध मजबूत करण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. इस्लाममध्ये प्रत्येक मुसलमानाला मानवतेचा सेवक म्हणून पाहिले जाते. अल्लाहच्या आदेशाचे पालन करून, गरजूंना मदत करणे ही केवळ धार्मिक कर्तव्याचाच भाग नाही, तर ती एक मानवी जबाबदारी आहे.”
सामाजिक जीवनात समाजातील मुख्य प्रवाहात नसलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शेख पतीपत्नी करत आहेत. मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशनची सामाजिकदृष्ट्या ही सेवा नक्कीच महत्त्वाची आहे. समाजातील नागरिकांना नेमके काय हवे आहे, हे लक्षात घेऊन आपल्या सेवेचे स्वरूप ही संस्था ठरवत असते. त्यांच्या या कार्याला ‘आवाज मराठी’कडून खूप खूप शुभेच्छा !