चिपळूणच्या अहमदअली शेख यांनी 'असा' रचला इतिहास

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 29 d ago
अहमदअली शेख यांचे अभिनंदन करताना चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य.
अहमदअली शेख यांचे अभिनंदन करताना चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य.

 

भारतात प्रतिष्ठित आणि खडतर मानल्या जाणाऱ्या 'डेक्कन क्लिफहँगर' या सायकल स्पर्धेचे यंदा ११वे वर्ष होते. वेगवान शर्यत प्रकारामधील ही अल्ट्रारेस पुणे ते गोवा या ६४७ किलोमीटर आणि तब्बल ५२०० मीटर एलिवेशन असलेल्या खडतर मार्गावर पुणे इथून दख्खनच्या पठारावरून सुरू होते. सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरून ती पुढे जाते आणि घनदाट जंगलांनी झाकलेल्या खडकांमधून गोव्यातील किनारपट्टीवर संपते. 'चिपळूण सायकलिंग क्लब'च्या अहमदअली शेख यांनी वेळमर्यादेच्या आत पूर्ण करत एक नवा इतिहास रचला आहे.

महाराष्ट्रात रॉकेटसिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहमदअली शेख यांनी ही स्पर्धा ३६ तास ३५ मिनिटांत यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे आता ते 'रेस अक्रॉस अमेरिका' या जगातील सर्वांत कठीण मानल्या जाणाऱ्या अल्ट्रासायकलिंग स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. या स्पर्धेत ३९ तासांचा वेळ मिळालेला असूनही 'रेस अक्रॉस अमेरिका' या स्पर्धेसाठी 'डेक्कन क्लिफहँगर' ही स्पर्धा ३७ तासांच्या आत पूर्ण करणे गरजेचे होते. अहमदअली शेख यांनी स्वतःला सिद्ध करत ही स्पर्धा दिलेल्या वेळेआधीच पूर्ण केली आणि इतिहास घडवला.
 
अहमदअली हे डेक्कन क्लिफहँगर सायकल स्पर्धेत भाग घेणारे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले आणि एकमेव सायकलपटू आहेत. त्यांनी १८ ते ४९ या वयोगटामध्ये सोलो सेल्फ सपोर्टेड या श्रेणीत सहभाग घेतला होता. 

३० नोव्हेंबरला पहाटे ४ वाजता पुण्याहून सुरू झालेली ही स्पर्धा पाटस, विटा, मलकापूर, राजापूर, बांदामार्गे गोवा इथपर्यंत झाली. कडाक्याची थंडी आणि भरदुपारचे ऊन झेलत हे ६४७ किलोमीटरचे अंतर पार करायचे होते. 
 
सलग चार दिवस अत्यंत व्यस्त दिनक्रम, घरगुती अडचणी, अपुरी झोप, खराब रस्ता अशा प्रतिकूल परिस्थितीतही अहमदअली यांनी ही स्पर्धा ३६ तास ३५ मिनिटांमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केली. इतकेच नव्हे तर सवयीप्रमाणे त्यांनी स्वतः सोबतच इतर स्पर्धकांनाही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी मोठी मदत केली. त्यामुळे चिकाटी आणि जिद्दीसोबतच त्यांच्या खिलाडुवृत्तीचेही सर्वत्र कौतुक होत आहे. स्विमिंग, रनिंग, क्लबच्या माध्यमातून नियमित सायकलिंग, समतोल आहार यांच्या मदतीने हे यश मिळाल्याचे अहमदअली सांगतात.

अहमदअली यांच्या विक्रमांची मालिका सुरूच
'डेक्कन क्लिफहँगर' स्पर्धा जिंकत अहमदअली यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरीची मालिका चालू ठेवली आहे. सप्टेंबर महिन्यातच त्यांनी  ‘हाफ आयर्न डिस्टन्स ट्रायथलॉन’ या स्पर्धेत लोहपुरुष किताब पटकावला होता. या स्पर्धेत दहा तासांमध्ये १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग, २१ किमी धावणे हे तिन्ही प्रकार लागोपाठ पूर्ण करावे लागतात. मात्र अहमदअलींनी ही ट्रायथलॉन ७ तास २० मिनिटांमध्येच पूर्ण करत हाफ आयर्नमॅन हा किताब पटकावला.
 
अहमदभाईच्या नावावर या आधीही अनेक सायकलिंगमधले विक्रम आहेत. तीनवेळा सुपर रँडेनियर, १००० किमी एलआर एम, १२०० किमी एलआर एम, ७०.३ हाफ आयरनमॅन, सह्याद्री क्लासिक ४ घाट, १० हजार मीटर फूल एव्हरेस्टिंग आदींमध्ये त्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter